आरडीसीसी बँकेच्यावतीने शोकसभा

माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांना श्रध्दांजली अर्पण

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांनी कर्तृत्वाच्या, जोरावार अभ्यासू वृत्तीने सहकार, सामाजिक, राजकिय अशा अनेक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला. विधी मंडळात एक प्रभावी वक्त्या म्हणून त्यांनी छाप टाकली. मच्छीमारांसह शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवींचे प्रश्नांची सोडवणूक करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली असून आमच्या आदर्श आणि सर्व सामन्यांच्या आधारवड हरपल्या, असे प्रतिपादन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी केले.

माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनानिमित्त रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात सोमवारी (दि.08) रोजी शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी ते शोकव्यक्त करताना बोलत होते. यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक द्वारकानाथ नाईक, विद्यमान संचालक पी. डी. पाटील, अस्लम राऊत, प्रवीण लाले, ॲड. परेश देशमुख, विजय गिदी, महेश म्हात्रे, तानाजी मते, संतोष पाटील, हनुमंत जगताप, एकनाथ गायकवाड, किसन उमटे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक तसेच बँकेचे अधिकारी आणि जिल्ह्यातील कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी सुरेश खैरे म्हणाले, मीनाक्षी पाटील यांनी सर्वच क्षेत्रात एक वेगळ्या पध्दतीने कार्य केले आहे. जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेता म्हणून काम करीत असताना प्रशासनावर एक वेगळी पक्कड त्यांनी निर्माण केली होती. प्रत्येक विषयावर त्या अभ्यासपुर्ण बोलायच्या. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या वेळी सत्ताधाऱ्यांकडून काय चुका झाल्या हे ते दाखवून देत होते. ज्यावेळी त्या सभागृहात बोलायला उभ्या राहिल्यावर तेथील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत होती. सहकार क्षेत्रातदेखील त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. बँक कर्मचाऱ्यांपासून संचालक म्हणून त्यांनी महत्वपूर्ण भुमिका बजावली. तसेच, पत्रकार क्षेत्रातही त्यांचे काम चांगल्या पध्दतीने होते. पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभे राहण्यासाठीदेखील त्यांचे कार्य मोलाचे राहिले आहे.

अलिबाग-उरण विधानसभा मतदार संघात त्या आमदार म्हणून 1995 मध्ये निवडून आल्या. त्यानंतर त्या राज्यमंत्री झाल्या. कोकणातील मच्छीमारांसह शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रभावी काम केले. राजकिय, सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना कौटुंबिक जिव्हाळयाचे संबंध कसे जपावे हे मीनाक्षी पाटील यांच्याकडून शिकण्यासारखे होते. त्यांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरणार आहे, असे बँकेचे संचालक विजय गिदी यांनी सांगितले.

यावेळी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, माजी संचालक द्वारकानाथ नाईक यांनी देखील ताईंच्या आठवणींना उजाळा दिला तसेच बँकेचे संचालक महेश म्हात्रे यांनी मीनाक्षीताई पहिल्यांदा आमदार झाल्या त्यावेळी अलिबाग-उरण मतदारसंघातील माणसे जोडण्याचे त्यांचे कौशल्य कसे अफाट होते याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, संचालक तानाजी मते तर कर्मचारी प्रतिनिधीच्यावतीने संदेश पाटील, रामभाई देशमुख यांनी मीनाक्षीताईंच्या कार्याची माहिती देत शोक व्यक्त केला. या शोकसभेचे सुत्रसंचलन संदीप जगे यांनी केले.

Exit mobile version