| म्हसळा | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी त्यांच्या दोन्ही मुलांचा वेळास समुद्रात बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी संतोष पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत शोक व्यक्त केला.
संतोष पाटील यांच्या बहिणीचा मुलगा हिमांशू पाटील सुट्टीसाठी ऐरोलीहून मामाच्या गावी आला होता. दरम्यान, संतोष पाटील यांची अवधूत आणि मयुरेश ही दोन मुले, हिमांशू आणि काही मित्र असे श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी गेले होते. मात्र, फिरण्यासाठी गेले असता या तिघांना समुद्र किनार्यावर फुटबॉल खेळण्याचा मोह झाला आणि यावेळी फुटबॉल पाण्यात गेल्याच्या निमित्ताने एकाने उडी घेतली. मात्र, ओहोटीच्या लाटेचा अंदाज न आल्याने या तिघांना समुद्राने आपल्याकडे खेचून घेतले आणि यामध्ये या तिघांचा बुडून मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वीच पाटील कुटुंबांनी नवीन गाडी घेतली होती. नवीन गाडी आणण्यासाठी संपूर्ण कुटुंब आनंदाने शोरुममध्येसुद्धा पोहोचले होते. मात्र, आता हा आनंद दुःखात बदलला आहे. शनिवारी संतोष पाटील यांच्या निवासस्थानी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी सांत्वनपर भेट दिली. यावेळी हजारो नागरिकांनी श्रद्धांजली देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.