| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शिंदे गटाचे आ. महेंद्र दळवी यांचा पैशांच्या गठ्ठ्यांसोबतचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणींच्या योजना, नुकसान भरपाई, महिलांवरील वाढते अत्याचार, असे अनेक विषय महत्त्वाचे आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांना अपंगत्व आले आहे. मात्र, सत्ताधारी आमदार या सर्वांकडे दुर्लक्ष करुन भ्रष्टाचार करण्यात गुंतले आहेत. दळवींच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून सखोल चौकशी करावी, अशी मागणी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी बुधवारी (दि.10) दिली.
महेंद्र दळवी यांच्यासमोर नोटांचे बंडल असल्याचा व्हिडिओ नुकताच ताजा असताना आता शिंदे सेनेतील मंत्री आ. भरत गोगावले यांच्या नोटांसोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये मंत्री भरत गोगवले मोठ्या रकमेसह दिसत आहेत. मंत्री गोगावले यांच्यासमोर मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. सुनील तटकरे हेदेखील गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील आमदारांचा भ्रष्टाचार समोर आणत आहेत. रायगडच्या महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्षात या व्हिडीओमुळे नवी ठिणगी पडली आहे.
आजपर्यंत आ. दळवींवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरलेले अलिबाग मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सातही मतदारसंघांतील आमदारांमध्ये ते याबाबत आघाडीवर आहेत. घरगुती हिंसाचार, चोरी, मारामारी, जमीन हडप करणे, यासंदर्भात अलिबाग पोलीस ठाण्यात 2010 पासून दळवींविरोधात गुन्हे दाखल आहेत.
शिंदे गटाच्या अडचणीत वाढ
ऐन अधिवेशन काळात हा व्हिडिओ समोर आल्याने येत्या काळात मंत्री भरत गोगावले यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच ठाकरे सेनेचे माजी आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासमोर नोटांचे बंडल असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हिडिओनंतर सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच, आता पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिंदे सेनेच्या आमदारापाठोपाठ आता मंत्री भरत गोगावले अडचणीत आले आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी या व्हिडिओंची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी केली आहे. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती थेट मुख्यमंत्र्यांना केली आहे.
अनेक कामे अपूर्ण
अलिबाग, रोहा तसेच मुरुड तालुक्यातील अनेक विकासकामे अपूर्ण आहेत. कंत्राटदार आमदाराच्या कमिशनमुळे दबले असल्याचे दबक्या आवाजात बोलत आहेत. निधी नाही म्हणून कामे रखडली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते, मग आमदारांकडे इतकी रक्कम येतेच कशी? हा व्हिडिओ खरा आहे की खोटा, याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे मत चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले. तसचे दळवींच्या संपत्तीची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी करत हे कधी थांबणार, असा सवाल त्यांनी माध्यमांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचवेळी मुरुड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
