अभियंतादिनी कार्यशाळेचे आयोजन

| मुंबई | प्रतिनिधी |
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे गतिमान व कायापालट करण्याच्या दृष्टीने व विभागाची कार्यपध्दती अधिक दर्जेदार व सक्षम करण्यासाठी अभियंता दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 15 सप्टेंबर रोजी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विभागातील अभियंत्यांच्या नवनीवन संकल्पना व योजना यांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यशाळेस राज्यातील सर्व विभागीय मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता उपस्थित राहणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असे सुमारे 98 हजार 000 कि.मी. च्या रस्त्यांची नवीन कामे तसेच देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येतात. सध्याच्या परिस्थितीत यामधील काही रस्त्यांची पुनर्बांधणी करणे आवश्यक असून, त्या दृष्टीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. राज्यातील ब्रिटिशकालीन पूल, इमारती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील येत असून, हे पूल व इमारती आणि रस्ते यांचा दर्जा अधिक सुधारण्याचे आव्हान राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आहे. त्यादृष्टीने सदर कार्यशाळेमध्ये सविस्तर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.

15 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता षण्मुखानंद सभागृह, सायन येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार अधिक सक्षम व दर्जेदार होण्याच्या दृष्टीने नवीन दिशा मिळणार आहे.

Exit mobile version