| खांब | वार्ताहर |
ज्ञानप्रबोधिनी, शैक्षणिक उपक्रम संशोधिका, पुणे व श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा यांच्या द्वारा इ. दहावीतील निवडक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आला होता. स्वतःचा स्वतः अभ्यास करण्यासाठी स्वयं अध्ययन वर्ग 11 व 12 नोव्हेंबर या दोन दिवसीय कालावधीत श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा येथे घेण्यात आला.
प्रशिक्षणाचे उद्घाटन सोमवार, दि.11 रोजी, श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा व एक्सेल उद्योग समूहाचे सीएसआर प्रमुख सुशील रुळेकर यांनी केले. तर ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका, पुणे येथून ओंकार बाणाईत, पुण्यातील हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयातील माजी प्राचार्य व इतिहास पाठ्यपुस्तकाचे लेखक गणेश राऊत व प्रा. गार्गी राऊत यांनी विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा तंत्र, माहितीची पुनर्मांडणी, प्रश्नपत्रिका विश्लेषण, उजळणी तंत्र प्रत्यक्ष कृतीद्वारा शिकविण्यात आले, आणि दहावीची विज्ञान प्रात्यक्षिके देखील प्रत्यक्ष करण्यावर भर देण्यात आला.रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे 17 विविध शाळांमधील 58 विद्यार्थी या मार्गदर्शन वर्गामध्ये सहभागी झाले होते.या वर्गाच्या यशस्वीतेसाठी व्हिआरटीआय च्या शिक्षण समन्वयक हर्षदा दगडे, प्रसाद भोईर, तसेच ज्ञान प्रबोधिनीचे तेजल नवशे, संपदा शिर्के आणि संतोष राठोड यांनी प्रयत्न केले.