| महाड | वार्ताहर |
रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या प्रयत्नातून मागील 30 वर्षे सुरू असलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गास चालू वर्षी देखील शासनाने मंजुरी दिली असून येत्या एक एप्रिल पासून (दि.31) मे पर्यंत अलिबाग येथील जे.एस.एम. कॉलेज येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ग्रंथालय संघाच्या माध्यमातून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रात करण्यात आली आहे. आता पर्यत 900 पेक्षा जास्त जणांना याचा लाभ झाला आहे. या अभ्यासक्रमामध्ये 45 मिनिटांच्या एकूण 240 तासिका ठेवण्यात आले असून विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्र वर्गासंदर्भात आवश्यक असलेले संदर्भ ग्रंथ क्रमिक पुस्तके आवश्यक वह्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित ग्रंथालय संघावर शासनाने निर्देशित केली आहे.
या निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित संस्था व शिक्षकांवर राहणार आहे शिक्षकांचे मानधन शासनाच्या नियमानुसार धनादेशाने द्यावयाचे आहे. प्रशिक्षणानंतर या ग्रंथपालन प्रमाणपत्रामुळे माध्यमिक शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ग्रंथालय, आश्रम शाळा, न्यायालय, महामंडळ, आरोग्य विभाग, शासकीय, निमशासकीय कार्यालय, आदिवासी प्रकल्प विभाग आदी विभागातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जूनमध्ये शासकीय वेळापत्रकानुसार पहिल्या आठवड्यात या प्रमाणपत्र वर्गाच्या परीक्षा संपन्न होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे यांनी दिली.