पीएनपी शैक्षणिक संकुलात कार्यशाळेचे आयोजन

विद्यार्थ्यांना दिले जीवनकौशल्याचे धडे

| रायगड | प्रतिनिधी |

किशोरवयीन वयात होणारे शारीरिक आणि वैचारिक बदलाने विद्यार्थी खचून जातात. त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. या वयात मुला- मुलींना वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ते भरकटण्याची शक्यता असते. यासाठी किशोर वयात असणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण जीवन जगण्याचा मंत्र देऊन संस्कारक्षम बनविण्यासाठी एम्पाहर इंडिया, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग पंचायत समिती यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाचा सेतू उभारण्यात आला आहे. यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन पीएनपी शैक्षणिक संकुल वेश्वी येथे आयोजित कार्नाय्त आले होते. या कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी किशोरवयीन मुला-मुलींना जीवन कौशल्याने सक्षम बनण्याचे धडे दिले.

सेतू कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुला-मुलींना आरोग्य पोषण, लिंग भाव, समता आणि सुरक्षा, आर्थिक साक्षरता या विविध विषयांवर मुलामुलींबरोबर वर्षभर संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तालुक्यामधील 19 शाळांमध्ये सेतू उपक्रम सुरु करण्यात आला आहे. कार्यक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण तालुक्यातील शाळांमध्ये करण्यात येणार आहे. किशोरवयीन मुलामुलींना जीवन कौशल्य शिकवून सक्षम पिढी बनविणे हा या सेतू उपक्रमाचा उद्देश असल्याचे उपस्थित मान्यवरांनी पीएनपी शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यशाळेत अधोरेखित केले. या सेतू उपक्रमाच्या तालुकास्तरीय कार्यशाळेसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीत गुरव, माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, गट विकास अधिकारी शुभांगी नाखले, सहाय्यक गट विकास अधिकारी मंगेश पाटील, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, एम्पोहर संस्थेचे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनामरा बॅग, वरिष्ठ व्यवस्थापक दीप्ती हजारे, तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पीएनपी शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंद, एम्पोहर संस्थेचे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किशोरवयीन मुलामुलींना बदलत्या जीवनशैलीमधील महत्वाचे घटक समजावून सांगणे महत्वाचे आहे. शासन आणि खासगी संस्था ज्याप्रमाणे पुढाकार घेऊन किशोरवयीन मुलामुलीना संस्कारक्षम बनविण्याचा विदा उचलला आहे. खरेतर मुलांच्या नेहमीच जवळ असणारे पालक हेच खरे त्यांचे सेतू असतात. त्यामुळे शिक्षकांनी आणि सेतू उपक्रम राबविणाऱ्यांनी पालकांपर्यंत पोहचले पाहिजे. यामुळे विद्यार्थी जीवन कौशल्य जाणून घेत सामाजिक समानता टिकवून ठेवून सुजाण नागरिक बनण्याबरोबर सक्षम बनतील. किशोर वयात संस्कारक्षम कौशल्ये त्यांच्या मनात रुजवली तरच सुदृढ आणि सक्षम भारत निर्माण करण्याकडे आपले पाऊल सहज पडेल असे रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी सांगितले.

किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक बदल होत असतात. त्यांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलामुळे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण तयार होते. त्यांच्यामानातील भीतीचे विचार घालविण्यासाठी त्यांच्याबरोबर शारीरिक बदलाबाबत बोलून त्यांना मार्गदर्शन करायला हवे. विद्यार्थ्यांबरोबर वेळीच चर्चा करून त्यांना शहाणे केले तर त्यांच्या विचार क्षमतेत सुधारणा होऊन ते निर्णयक्षम होऊन आपली जबाबदारी सहजगत्या पार पडू शकतील असे माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी सांगितले.

Exit mobile version