। कोर्लई । वार्ताहर ।
लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट या सामाजिक संस्थेअंतर्गत अलिबाग विभागामध्ये बोर्ली, वळके, रामराज, बेलोशी या चार केंद्राच्या सर्व दहावीतील विद्यार्थी आणि पालकांसोबत महाचर्चा हा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट जसे विद्यार्थ्यांसोबत अनेक उपक्रम घेत असते तसेच पालकांसोबत सुद्धा विविध उपक्रम घेते. इयत्ता दहावीच्या वर्षाचे गांभीर्य सर्व दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांना कळावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. तळागाळातील गरीब-गरजू होतकरू मुलगा शाळेमध्ये गेला पाहिजे व तो शाळेत टिकला पाहिजे या मुख्य उद्देशाने लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था गेली 16 वर्षे अलिबागमध्ये कार्यरत आहे. या वर्षासाठी संस्थेने बोर्ली,वळके, रामराज व बेलोशी अशा चार विभागातून 296 मुलांची निवड केली आहे. 296 मधून 97 विद्यार्थी यावर्षी दहावीमध्ये आहेत. महाचर्चा हा कार्यक्रम 80 विद्यार्थी आणि 59 पालकांसोबत घेण्यात आला.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच चेतन जावसेन, वळके हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.डी. नाईक, बेलोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक भोईर, वळके हायस्कूलचे शिक्षक मोरेसर, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक अविनाश पाटील, आशिष कचरेकर, श्रीपाद नाईक, रश्मी अष्टमकर, अनुजा राऊळ उपस्थितीत होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष कचरेकर, श्रीपाद नाईक, रश्मी अष्टमकर, अनुजा राउळ यांनी विशेष परिश्रम घेतले.