शेकाप कार्यकर्ता एकनिष्ठ विलास थोरवे यांचा विश्‍वास

नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता आणि या तालुक्यात आज देखील शेकापचे मतदार ठाम असून ते एकनिष्ठपणे शेतकरी कामगार पक्षावर विश्‍वास ठेवून आहे असे प्रतिपादन शेकापचे जिल्हा नेते विलास थोरवे यांनी केले.खांडस जिल्हा परिषद गटाची बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला,त्यांचे स्वागत शेकापच्या तालुका स्तरीय नेत्यांनी केले.
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन केले होते,त्यावेळी माजी तालुका चिटणीस आणि शेकापचे जिल्हा नेते विलास थोरवे,रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि समाजकल्याण समितीचे माजी सभापती नारायण डामसे, जिल्हा परिषद सदस्या सिमा पेमारे, उपसभापती जयवंती हिंदोळा,माजी उपसभापती यशवंत जाधव, अशोक पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पेमारे,पं.समिती सदस्या कविता ऐनकर,रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रकाश फराट,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रविंद्र झांजे,माजी सरपंच अशोक भुसाळ,दादा पादीर,पुरोगामी युवक संघटना कर्जत तालुका अध्यक्ष वैभव भगत,तसेच हनुमान बदे,माजी सरपंच कृष्णा बदे,माजी सरपंच रेवती ढोले आदी उपस्थित होते.पक्षाची बैठक यशस्वी व्हावी यासाठी पक्षाचे कळंब विभाग चिटणीस पांडुरंग बदे,पुरोगामी युवक तालुका उपाध्यक्ष अनिल जोशी,पुरोगामी युवक तालुका खजिनदार महेश म्हसे, अल्पसंख्याक सेल चे जिल्हा अध्यक्ष बबन भालेराव,पोशिर ग्रा.पं.सदस्य दत्ता राणे,नितीन गायकर,प्रशांत म्हसे,गणपत भगत,जयवंत म्हसे,आदींनी पुढाकार घेतला होता.
उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शेकापचे नेते विलास थोरवे यांनी आगामी जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीची निवडणूक शेकाप स्वबळावर लढला तरी विजय आपलाच आहे असा विश्‍वास विलास थोरवे यांनी व्यक्त केला.तालुक्यातील आपला मतदार ठाम असून आपले एकनिष्ठ मतदार लक्षात घेता आपल्यासोबत युती संदर्भात चर्चा केल्या जात आहेत.मात्र पक्षाचे राष्टीय सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांचा आदेश आले त्याप्रमाणे आपले सर्व कार्यकर्ते काम करतील असा विश्‍वास देखील थोरवे यांनी व्यक्त केला.तर जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश फराट यांनी तालुक्यात काय चर्चा चालली आहे याचा विचार न करता आपल्या कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एक एक कार्यकर्ता वाढवावा अशी सूचना केली,पक्ष नेतृत्व आपल्या पक्षाची वाढ होईल असेच निर्णय घेतील,त्यामुळे तो विचार बाजूला ठेवून पक्षाचे कार्यकर्ते कसे जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य होतील यासाठी प्रचाराचे काम सुरू करावे असे आवाहन त्यांनी केले.जिल्हा अल्पसंख्यांक सेल चे अध्यक्ष बबन भालेराव यांनी कर्जत तालुक्यातून यावेळी मागील वेळपेक्षा अधिक सदस्य निवडून गेले पाहिजेत यासाठी आपण ताकदीने काम करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी माजी समाज कल्याण सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे यांच्या कार्याप्रणालीवर विश्‍वास ठेवून ओलमण ग्रामपंचायत मधील बोरगाव,बोंडेशेत या गावातील तरूण कार्यक्रर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.

Exit mobile version