सरपंच, उपसरपंच यांच्यातील वाद चव्हाट्यावर

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

पर्यटननगरी दिवेआगर येथील ग्रामपंचायतीत अंतर्गत वादाने गंभीर वळण घेतले असून, सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. रिसॉर्टच्या वीजजोडणीचा प्रश्न आणि घराच्या असेसमेंट उताऱ्यातील कथित अनियमिततेवरून सुरू झालेला वाद थेट आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला. ग्रामपंचायत कार्यालयातील वाढत्या गोंधळामुळे पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्याने दिवेआगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.27) रिसॉर्टच्या वीजजोडणीचा प्रश्न तसेच घराच्या असेसमेंट उताऱ्यात नियमबाह्य बदल झाल्याच्या कथित प्रकारावरून उपसरपंच वसीम फकजी आणि अन्य सदस्यांनी सरपंच विजय तोडणकर यांना जाब विचारला. याच मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढत गेल्याचे समजते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना ग्रामपंचायत कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले. या वादादरम्यान सरपंच विजय तोडणकर यांनी आपल्याला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप उपसरपंच वसीम फकजी यांच्याकडून करण्यात आला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने दिघी सागरी पोलीस ठाण्यात सरपंचांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच, सरपंच विजय तोडणकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणल्याचा व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून उपसरपंच वसीम फकजी यांच्यासह एकूण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Exit mobile version