संजय शिरसाट यांचा फडणवीसांवर पटलवार
| मुंबई | प्रतिनिधी |
एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर भाजपाच्या 105 जणांना विरोधात बसावं लागलं असतं, अशा शब्दांत शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. आम्ही 115 जण असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे सत्तेत असणार्या दोन्ही पक्षांमध्येच सध्या जुंपलेली दिसत आहे.
महायुतीत जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी भाजपावर नाराजी व्यक्त केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून माझ्या मुलाला हेतूपुरस्सर त्रास दिला जातोय, असा आरोप कदम यांनी केला आहे. कदम म्हणाले, महाराष्ट्र भाजपातील काही लोक अतिशय घृणास्पद काम करत आहेत. त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही भाजपा नेत्यांचे कान उपटले पाहिजेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो. परंतु, जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत, त्यांचा केसाने गळा कापू नका. असं केल्यास भाजपाकडून लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, याचं भान त्यांनी ठेवायला हवं.
रामदास कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, रामदास कदम यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. अशा प्रकारची वक्तव्यं करण्याची त्यांची सवय आहे. टोकाचं बोलण्याचीदेखील त्यांना सवय आहे. ते बर्याचदा रागानेही बोलतात. परंतु, भाजपाने शिवसेनेचा नेहमीच सन्मान केला आहे. आम्ही 115 आहोत तरीदेखील आमच्याबरोबर आलेल्या एकनाथ शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्याबरोबर आली याचं आम्हाला समाधान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमचं पूर्ण समर्थन आहे.
