पनवेलकरांमध्ये घरपट्टीविषयी संभ्रमावस्था

| नवीन पनवेल | वार्ताहर |
सध्या पनवेल महानगरपालिका नागरिकांना सोशल मीडिया, फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष घरपट्टी भरण्याच्या सूचना करीत आहे. नोटिशी पाठवत आहे. सिडकोला घरपट्टी भरलेली असताना पुन्हा पनवेल महानगरपालिका नागरिकांकडून जिझिया करासारखी वसुली करीत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या या जिझिया कराविरोधात पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका लिना गरड यांनी उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडे रिट याचिका दाखल केली आहे. पनवेलकर जनतेच्या मनात सदरच्या घरपट्टी विषयी संभ्रमावस्था आहे. याविषयी चर्चा करण्यासाठी रविवार, दि. 19 जून रोजी सायं. 5 वा. पृथ्वी हॉल, शबरी हॉटेल मागे, से.1 एस, नवीन पनवेल येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेलकर जनतेला घरपट्टीबाबतच्या प्रश्‍नांना उत्तरं देण्यासाठी बाळाराम पाटील (आमदार, कोकण पदवीधर शिक्षक मतदार संघ), प्रितम म्हात्रे (विरोधी पक्षनेता,पमपा), रिट याचिकेची जनतेची केस लढणारे वकील अ‍ॅड. विजय कुरले उपस्थित राहणार आहेत. आपल्या मनात घरपट्टी बाबतचे काही प्रश्‍न असल्यास ते प्रश्‍न घेऊन या कार्यक्रमात जरूर यावे, असे आवाहन शेकापचे प्रभाकर कांबळे यांनी केले आहे.

Exit mobile version