स्थानिकांवर अन्याय, गोडाऊन वाल्यांना अभय?
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील दिघोडे-चिर्ले हा रस्ता वाहतुकीला अपुरा पडत होता. ही बाब लक्षात घेत या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व काँक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केले जात आहे. मात्र, हा रस्ता करताना सरकारी मोजणी झाली नाही. तरीदेखील सबंधित ठेकेदारांनी स्वतःच्या मर्जीनुसार लाईन टाकून स्थानिकांवर अन्याय केला आहे. तर, गोडाऊनवाल्यांना वाचविण्याचा प्रयत्न चालू आहे, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
उरण तालुक्यातील दिघोडे नाका हा दिवस-रात्र गजबजलेला असतो. या ठिकाणी विविध प्रकाराची दुकाने आहेत. त्यामुळे येथील रस्त्याचे काम दिवाळीनंतर हाती घेऊ, तोपर्यंत इतर कामे करू असे ठरविण्यात आले होते. परंतु, संबंधित ठेकेदाराने भर पावसात नाक्यावरील स्थानिकांची दुकाने व कंपाउंड पोलीस संरक्षणात तोडून अन्याय केला. तर, दुसरीकडे गोडाऊनवाल्यांनी भर रस्त्यातून बेकायदा विजेचे पोल टाकून गोडाऊनमध्ये वीजपुरवठा केला आहे. तसेच, रस्त्याचे काम चालू असताना चिर्ले ते दिघोडे रस्ता व पाईप लाईनमधील जागा डेब्रिज मातीने भरली जात होती. ही बाब स्थानिकांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणल्यानंतर त्यांच्याकडून थातूरमातूर कारवाई केली गेली. मात्र, त्यानंतर देखील ठेकेदारांनी परत डेब्रिज टाकून रस्त्याचे काम चालूच ठेवले. त्यानंतर ही बाब इंजिनिअर एम.के यांच्या निदर्शनात आणून दिल्यावर आम्ही कारवाई करू, अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेली, असा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
त्याचबरोबर रस्त्याचे कामे करताना पाण्याच्या मोऱ्या सुस्थितीत आहेत की नाहीत, या सर्व गोष्टींची खात्री करूनच रस्त्यावरील कामे करण्यात येतात. रस्त्यावर विद्युत पोल अडथळा ठरत असतील तर ते काढण्यासाठी रीतसर परवानगी घेऊन ते काढावे लागतात. रस्त्यावरील पाण्याचा निचरा करणाऱ्या मोऱ्या गोदामवाल्यांनी गिलंकृत केल्या आहेत. पाण्याची पाईप लाईन ही मोऱ्यांच्या खालून टाकायला हवी असताना तसे न केल्यामुळे ही पाईप लाईन पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरत आहे. असे असून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदारांना अभय दिले जात असल्याची चर्चा सुरू आहे. या रस्त्याच्या बांधकामांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरीकांनी केली आहे.
गोडाऊनवाल्यांनी आपल्या गोडाऊनपर्यंत वीज नेण्यासाठी रस्त्यावर जे बेकायदा विजेचे पोल टाकले आहेत, ते काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाही.
– एम. के. इंजिनियर, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण
रस्त्याचे काम करत असताना रस्त्यावरील विजेचे पोल हे रीतसर परवानगी घेऊन ते पोल अगोदर काढण्यात यावे. त्यानंतर रस्त्याची कामे करावित. ही बाब आम्ही सार्वजनिक बांधकाम खाते व ठेकेदार यांच्या निदर्शनात आणून दिली आहे.
– गजानन चव्हाण, सहाय्य्क अभियंता, महावितरण, जासई







