| पनवेल | प्रतिनिधी |
मतदार यादीत नमूद केलेल्या पत्त्यांवर अनेकजण वास्तव्य करीत नसल्याचे बीएलओने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे अशा मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात येणार असल्याने चार तारखेला देऊन पाच जानेवारीपर्यंत उत्तर देण्यात यावे, अशा प्रकारच्या नोटीस पाठवल्या होत्या. मात्र, एका दिवसात उत्तर देणे अशक्य असल्याने पनवेल तहसील निवडणूक विभागाने दोन आठवड्याची मुदत द्यावी, अशा मागणी पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
खारघर वसाहत, परिसरातील पाडे आणि गाव असे मिळून एक लाख पाच हजार मतदार होती. त्यात गेल्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्रामपंचायत, पालिका आणि विधानसभा मतदार दरम्यान झालेल्या निवडणुकीच्या वेळी बहुतांश मतदारांचे वास्तव्याचा पत्ता चुकीचा असल्यामुळे मतदान करताना धावपळ झाली होती. दरम्यान, पनवेल निवडणूक विभागाकडून दुबार मतदार नोंदणी तसेच मतदार वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी स्थळ पाहण्यासाठी बीएलओची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, मतदारांपर्यंत नेमलेले प्रतिनिधी पोहोचलेच नसल्याने चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच पनवेल विधानसभेतील रहिवासी प्रशासनाच्या चुकीमुळे मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने नोटिशीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्याची मुदतवाढ द्यावी, असे पत्र पनवेल तहसीलदारांना देण्यात आले आहे.







