महाडमध्ये शिक्षक नियोजनाचा गोंधळ; दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये दोन शिक्षक

। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत तालुक्यात जवळपास 134 प्राथमिक शाळांमधून दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्याची माहिती महाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे या दोन आणि नऊ विद्यार्थ्यांकरीता दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्या शाळांकडून शिक्षक देण्याची मागणी केली जाते त्या ठिकाणी मात्र शिक्षक दिला जात नाही अशी तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत.

गेल्या काही वर्षात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या वाढत चालली आहे. मात्र या शाळांवरील शिक्षकांची संख्या मात्र जैसे थेच आहे. या शाळांवर शिक्षकांची मागणी होते, त्या शाळांमध्ये शिक्षक दिले जात नाहीत. तर दहा पटसंख्यांच्या आतील शाळांवर दोन शिक्षक कार्यरत असल्याचे चित्र महाड तालुक्यात दिसून येत आहे. या अजब कारभारामुळे महाड पंचायत समितीचा शिक्षण विभाग कायम चर्चेत आला आहे. तालुक्यात दहा पटसंख्या असलेल्या जवळपास 134 शाळा आहेत. यातील जवळपास 55 शाळांमध्ये दहापेक्षा कमी पटसंख्या आहे. दहा पटसंख्येच्या आतील अनेक शाळा या शहरालगत आहेत. शिरगाव, दिवेकरवाडी, गोरीवले कोंड, नाते, दासगाव या शाळा शहरालगत आहेत.

विद्यार्थी संख्या घटली
दहा वर्षापूर्वी तालुक्यातील 334 प्राथमिक शाळा होत्या. आज ही संख्या घटत 308 वर आली आहे. वाढते नागरीकरण आणि नोकरीधंद्यानिमित्त झालेले स्थलांतर, यामुळे ग्रामीण भागामधील प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. महाड तालुका अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ वस्तीत असल्याने रोजगारानिमित्ताने अनेक तरूण शहराकडे वळले आहेत. ग्रामीण भागातील तरूणांचे वास्तव्य शहरात कायम होत चालले असल्याने मुलांनादेखील शिक्षणासाठी शहरातच घातले जात आहे.

पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता कल
इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा वाढलेला कल, लोकसंख्येमुळे गावातील विद्यार्थ्यांची घटलेली संख्या या सर्वांचा परिणाम जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळाशाळांवर झालेला दिसून येत आहे.

Exit mobile version