संसदेच्या सुरक्षेवरून गोंधळ

15 खासदारांचे निलंबन , लोकसभेतील 14 अन्‌‍ राज्यसभेमधील 1 खासदाराचा समावेश

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन घुसखोरांनी धुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे नव्या संसदभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून गुरुवारी (14 नोव्हेंबर ) लोकसभेत खासदारांनी गोंधळ घातला. त्याच पार्श्वभूमीवर असभ्य वर्तन केल्याप्रकरणी 15 खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. यात लोकसभेतील 14 आणि राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश आहे.

संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. सुरूवातीला काँग्रेस खासदार टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस यांचं हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतरही गदारोळ थांबला नसल्याने आणखी 9 खासदारांना निलंबित केले गेले. त्यात बेनी बेहानन, मोहम्मद जावे, पीआर नटराजन, कनिमोझी, व्हीके श्रीकंदन, के सुब्रमण्यम, एसआर पार्थिबन, एस वेंकटेशन आणि मणिकम टागोर यांचा समावेश आहे. तर, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओ ब्रायन यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.

लोकसभेमध्ये शून्य प्रहरातील चर्चा सुरू असताना बुधवारी दुपारी 1च्या सुमारास सागर शर्मा आणि मनोरंजन डी. या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून मुख्य सभागृहात उडया घेतल्या. ‌‘तानाशाही नहीं चलेगी’ अशा घोषणा देत त्यांनी पिवळा धूर सोडणाऱ्या नळकांडया फेकल्या. त्यामुळे सभागृह धुराने भरून गेले. घुसखोरांना उपस्थित खासदारांनी चोप दिला व सुरक्षा रक्षकांकडे सोपविले. त्याच वेळी संसदभवन परिसरात नीलम व अमोल शिंदे या दोघांनीही घोषणाबाजी करत धुराच्या नळकांडया फोडल्या. त्यांनाही पोलिसांनी अटक केली. अमोल हा लातुर जिल्ह्यातील असून शर्मा लखनऊ, मनोरंजन म्हैसूर तर नीलम हरियाणातील हिस्सारची राहणारी आहे.

Exit mobile version