कोणत्याही करारावर स्वाक्षरी न केल्याचा खुलासा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कार्यकाळ वाढवण्याच्या वृत्तावर सनसनाटी खुलासा केला आहे. ‘मी अद्याप बीसीसीआयच्या कोणत्याही करारावर स्वाक्षरी केलेली नाही, अशी प्रतिक्रिया गुरुवारी बीसीसीआयच्या आढावा बैठकीनंतर राहुल द्रविड यांनी दिली. कागदपत्रे मिळाल्यावर मी बघेन, असेही त्यांनी नमूद केले.
द्रविडचे हे वक्तव्य बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासमवेत दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आले आहे. या बैठकीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवडला जाणार होता, त्यात कराराबाबतही चर्चा झाली. त्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, द्रविडच्या या वक्तव्यामुळे बीसीसीआयवर प्रश्न नक्कीच निर्माण झाले आहेत.
याआधी बुधवारी बीसीसीआयने राहुल द्रविडसह सर्व सर्वच प्रशिक्षकांचा कार्यकाळ वाढवण्याची घोषणा केली होती. त्यात द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर विक्रम राठोड हे फलंदाजी प्रशिक्षक, पारस म्हांबरे गोलंदाजी प्रशिक्षक आणि टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. आता द्रविडच्या वक्तव्याने चिंता वाढली आहे.