| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
आपली उमेदवारी निश्चित समजून पनवेल पालिका हद्दीतील अनेक इच्छुकांनी प्रभागा- प्रभागात जनसंपर्क कार्यालये सुरु केली आहेत. मात्र, युती-आघाडीतील जागावाटपाचे सूत्र अद्यापही ठरलेले नाही. यामुळे पक्षश्रेष्ठी आपल्यालाच उमेदवारी देतील या अपेक्षेत असलेल्या इच्छुकांची चांगलीच गोची झाली असून, मोठ्या अपेक्षेने सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयातदेखील शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळत आहे.
पनवेल पालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. नामनिर्देश पत्र दाखल करण्यासाठी दोनच दिवसांचा अवधी बाकी असूनसुद्धा रविवारी (दि. 28) दुपारपर्यंत एकही नामनिर्देश पत्र दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यातच भर म्हणून युती होणार की नाही, या संभ्रमावस्थेत शिवसेना, भाजपा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटातील उमेदवार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा गट आण मनसे आघाडीतील घटक पक्षांकडून जागावाटप करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी कुठला पक्ष कोणत्या जागेवर उमेदवार देणार हे निश्चित नसल्याने आघाडीतील इच्छुकदेखील संभ्रमात आहेत. एक एका प्रभागात एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याकरिता सगळेच इच्छुक पक्षश्रेष्ठींच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत. यामुळे जनसंपर्क कार्यालयात बसण्यासाठी वेळ नसल्याने इच्छुकांचे समर्थकदेखील कार्यालयात बसणे टाळत असून, इच्छुकांनी सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयात शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळत आहेत.
तिकीट न मिळाल्यास कार्यालयांचे काय?
पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळेल या अपेक्षेने प्रभागात जनसंपर्क सुरु केलेल्या इच्छुकाला पक्षाने संधी न दिल्यास जनसंपर्काकरिता सुरु केलेले कार्यालय सुरु राहणार की बंद होणार, असा प्रश्न सामान्य मतदार उपस्थित करत आहेत.
पक्ष एकच, कार्यालय मात्र वेगवेगळे
आगामी पालिका निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीत इच्छुकांची संख्या सर्वात जास्त आहे. यापैकी अनेकांना पक्षनेतृत्व आपल्यालाच संधी देईल हे अपेक्षित पकडून प्रत्येक इच्छुकाने कार्यालय सुरु केली असल्याने पक्ष एकच, कार्यालयांची संख्या मात्र जास्त झाली आहे. काही भागात तर एकाच रस्त्यावर फक्त काही मीटर अंतरावर एकाच पक्षाची तीन-तीन कार्यालये सुरु आहेत.







