18 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
पोलीस दलात चर्चांना उधाण
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड पोलीस दलातील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा 18 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत. मात्र, या बदल्या केवळ बंदोबस्ताच्या अनुषंगाने तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने संबंधित अधिकाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. बदलीच्या ठिकाणी तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असले, तरी या नियुक्त्या कायमस्वरूपी नसल्याने अधिकाऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे रायगड पोलीस दलात या बदल्यांबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
रायगड पोलीस दलाच्या अखत्यारित 28 पोलीस ठाण्यांसह जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, दहशतवादविरोधी शाखा, बांगलादेशीविरोधी पथक, नियंत्रण कक्ष, वाचक शाखा तसेच इतर विविध विभाग कार्यरत आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली या सर्व विभागांचा कारभार चालतो. दरम्यान, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यामध्ये पाली, पेण, महाड तालुका, मुरूड, तळा, खालापूर, गोरेगाव, अलिबाग, माणगाव, मांडवा सागरी पोलीस ठाणे, जिल्हा वाहतूक शाखा आणि नियंत्रण कक्ष अशा एकूण 18 ठिकाणांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मात्र, या बदल्या तात्पुरत्या स्वरूपातील असल्याचे समोर येत असल्याने अधिकारी संभ्रमात पडले आहेत. एका ठिकाणी रुजू झाल्यानंतर पुन्हा कधीही दुसऱ्या ठिकाणी बदली होऊ शकते, अशी शक्यता असल्याने कुटुंबासह स्थलांतर करावे की नाही, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. तात्पुरत्या स्वरूपातील नियुक्तीमुळे राहण्याची व्यवस्था, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा मुक्काम याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, या निर्णयामुळे अनेक अधिकारी मानसिक तणावात असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या आदेशांमध्ये नियुक्तीचा कालावधी किंवा पुढील बदलीबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे. त्यामुळे या बदल्यांबाबत पोलीस मुख्यालयाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अचाल दलाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो होऊ शकला नाही.
कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे अजूनही दुर्लक्ष
रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलीस ठाणे तसेच विविध शाखांमध्ये कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी मे महिन्यापर्यंत केल्या जातात. मात्र, यंदा जून महिना संपत आला तरी अद्याप या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हजारो पोलीस कर्मचारी बदलीच्या प्रतीक्षेत असून, त्यांच्या नियुक्तीबाबतही अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे.
अजूनही साळेंच्याच नावाचा फलक
अलिबाग पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या जागी नागपूर पोलीस दलातून प्रवीण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी 15 जूनपासून अलिबाग पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या बदली आदेशांमध्ये प्रवीण पांडे यांचे नाव नसल्याने त्यांच्या नियुक्तीबाबतही संभ्रम कायम आहे. विशेष म्हणजे, त्यांनी पदभार स्वीकारून दहा दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही पोलीस ठाण्यातील नावफलकावर अजूनही किशोर साळे यांचेच नाव कायम आहे. साळे सध्या जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असून, त्यांच्या बदलीचे अधिकृत आदेशही अद्याप प्राप्त झाले नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे अलिबाग पोलीस ठाण्यातील पदस्थापनेबाबतही विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
