उरणकरांना वाहतूक कोंडीचे ग्रहण

विद्यार्थी, पालकांबरोबर जनताही हैराण; शाळा सुटण्याच्यावेळी पोलीस तैनात ठेवण्याची मागणी

| उरण | वार्ताहर |

उरण शहरात गेली अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या आ वासून उभी आहे. या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजनाच होत नसल्याने दररोज उरण शहरात महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पहावयास मिळत आहे. या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून ही समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी उरणमधील जनतेने केली आहे. सदरची वाहतूक कोंडी ही प्रामुख्याने रस्त्यावर अनधिकृत पार्किंग व वैष्णवी हॉटेलजवळ असलेल्या बेकायदेशीर पार्किंग झोन कारणीभूत तसेच नगरपालिकेने पार्किंगचे भूखंड बिल्डरांना विकले असल्याचे वाहनचालक सांगतात.

सध्या सर्वत्र शाळा महाविद्यालये सुरु झाली आहेत. या शाळांतील विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी व शाळा सुटल्यानंतर घरी नेण्यासाठी पालकही मोठ्या संख्येने येत असतात. ग्रामीण भागातून बाजारासाठी शहरात येणार्‍या नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रत्येकजण शहरात टू व्हीलर, फोर व्हीलर घेऊन येत आहेत. याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. उरण शहरात पार्किंगची पाहिजे तशी योग्य सुविधा, जागा नसल्याने याचे दुष्परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. नगरपालिका हद्दीत जे पार्किंग भूखंड होते, ते सत्ताधार्‍यांनी बिल्डरांच्या घशात घातल्याने ही समस्या उभी राहिली असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.

नियमबाह्यपणे वाहने पार्किंग करणार्‍यांवर तसेच रस्त्यावर वेडी वाकडी वाहने लावणार्‍यांवर उरण नगर परिषद किंवा पोलीस प्रशासनाच्या वाहतूक विभागातर्फे कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याने अवैध वा बेकायदेशीर पार्किंगला व वाहतूक कोंडीला प्रोत्साहन मिळत आहे. प्रशासनाने या सर्व समस्या लक्षात घेऊन उरण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी, अशी मागणी उरण शहरातील जनतेने केली आहे. उरणमधील नागरिकांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय बेलापूर, उरण नगर परिषद, वाहतूक विभाग, उरण पोलीस स्टेशन येथे पत्रव्यवहार करूनदेखील समस्या सुटत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. उरण शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे प्रामुख्याने उरण चारफाटा, आनंदनगर, पालवी हॉस्पिटल, राजपाल नाका, कोटनाका, गणपती चौक, स्वामी विवेकानंद चौक, पेन्शनर्स पार्क, वाणी आळी, तहसील कार्यालय आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसते.

पाच मिनिटांसाठी अर्धा तास
जिथे पाच मिनिटात पोहोचायला पाहिजे तिथे अर्धा ते एक तास लागत आहेत. पार्किंगसाठी योग्य नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय, अनेक दुकाने, टपरी यांचे सामान व हातगाड्या रस्त्यावर येत आहे. दुकानदार आपलं सामान रस्त्यावर विकण्यासाठी ठेवत असल्याने रस्ता त्या सामानाने भरून जातो. शिवाय, उरण शहरातील सर्वच रस्त्यावर भाजीपाला, व फळ विक्रेते, विविध वस्तू विक्रेते, हातगाडीवाले यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याने उरणमधील नागरिकांना मोकळा श्‍वास होणे कठीण जात आहे.
पोलीस बंदोबस्त हवा
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शाळा सुटण्याच्यावेळी तरी अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात यावी. तसेच वाहतूक कोंडीच्या ठिकाण वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी. विद्यार्थी व पालक वर्गांची मागणी
Exit mobile version