निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फसाठी काँग्रेस आक्रमक

काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरावृत्ती प्रक्रियेतील भोंगळ कारभारासह मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप रायगडच्या काँग्रेसने केला आहे. आयुक्तांना बडतर्फ करून अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले. भाजपच्या जून्या कार्यालयासमोर निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांचे छायाचित्र जाळून त्यांच्या कारभाराबाबत तीव्र निषेध व्यक्त केला. काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवडणूका स्वतंत्र व निपक्षपणे पार पडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. स्वायत्त असलेला निवडणूक आयोग मागील काही वर्षापासून सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले बनले आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपसाठी निवडणूकीत मॅच फिक्सींग करीत असल्याचा संशय रायगडच्या जिल्हा काँग्रेसने व्यक्त केला. एसआयआरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मतदारांंची नावे काढण्यात आली आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचे त्यांचे सहकारी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग सिंधू, आणि विवेक जोशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयावर दहा महिन्यात 14 वेळा त्यांनी अधिकृतपणे आक्षेप नोंदविला आहे. निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांबाबतचा दाखला काँग्रेसने दिला आहे.मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभारामुळे एसआयआरच्या कामकाजाबाबतही संशय व्यक्त करीत रायगड जिल्ह्यातील काँग्रेस सोमवारी रस्त्यावर उतरले. निवडणूक आयोगाने बोगस मतदार वाढविल्याचा आरोप काँग्रेसने करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ज्ञानेश कुमार यांची कृती देशद्रोहाची असून त्यांनी लोकशाही व संविधानिक मुल्ये पायदळी तुडविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करण्यात यावे, सखोल चौकशी करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागी जोर धरत काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान भाजपच्या जून्या कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात घोषणा देत ज्ञानेशकुमार यांचे छायाचित्र जाळले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजाभाऊ ठाकूर, ॲड. श्रध्दा ठाकूर, श्रुती म्हात्रे, डॉ. मनीष पाटील, नंदा म्हात्रे, मिलींद पाडगांवकर, योगेश मगर, काका ठाकूर, अशोक मोकल, नगरसेवक समीर ठाकूर, भास्कर चव्हाण आदी जिल्हा, तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version