राहुल गांधींच्या पोलीस चौकशीवरुन काँग्रेस आक्रमक

निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांशी झटापट
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत जोडो यात्रेदरम्यान केेलेल्या वक्तव्यावरुन खुलासा मागण्यासाठी दिल्ली पोलिसांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानावर आपला मोर्चा वळविला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस दल यांच्यात चकमक उडाली. स्पेशल सीपी सागर प्रीत हुड्डा रविवारी पुन्हा नोटीस देण्यासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. याआधीही 16 मार्च रोजी पोलीस नोटीस बजावण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते मात्र पथकाला तासनतास वाट पहावी लागली होती. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना नोटीस बजावत दिल्ली पोलिसांनी त्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे. काँग्रेस नेते अशोक गेहलोत, पवन खेडा आणि शक्ती सिंह गोहिल हेही त्यांची भेट घेण्यासाठी निवासस्थानी पोहोचले. भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माहिती घेण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले होते.

काँग्रेस आक्रमक
राहुल गांधी यांच्या घराबाहेर दिल्ली पोलिसांच्या तटबंदीमुळे काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रा संपवून 45 दिवस झाले आहेत. दिल्ली पोलीस 45 दिवसांनी चौकशीसाठी येत आहेत. त्यांना इतकी चिंता होती तर ते फेब्रुवारीत त्यांच्याकडे का गेले नाहीत? राहुल गांधी यांची कायदेशीर टीम यावर उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी दिली.

राहुल गांधी यांनी मागितला वेळ
आम्ही राहुल गांधींसोबत चर्चा केली आहे. त्यांनी म्हणाला मला याबाबत थोडा वेळ हवा आहे आणि तुम्ही जी माहिती मागितली आहे ती मी तुम्हाला देईल. आमची नोटीस त्यांच्या कार्यालयाने स्वीकारली आहे आणि जर चौकशी करायची असेल तर आम्ही करू, अशी माहिती विशेष सीपी सागर प्रीत हुडा यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?
भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणासंदर्भात दिल्ली पोलिसांना त्यांच्याकडून माहिती घ्यायची असल्याने त्यांनी नोटीस बजावली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी श्रीनगरमध्ये याबाबत भाष्य केले होते. महिलांवर अजूनही लैंगिक अत्याचार होत असल्याचं मी ऐकलं आहे. एका प्रकरणात माझे बलात्कार झालेल्या दिल्लीतील एका मुलीशी संभाषण झाले होते. यावेळी मी तिला विचारले की, आपण पोलिसांना कॉल करुया का? त्यावर तिने घाबरत कृपया पोलिसांना कॉल करू नका, असे सांगितले, असे राहुल गांधी म्हणाले होते.

Exit mobile version