सोलापुरात विरोधात नव्हे तर एकत्र लढणार
। सोलापुर । प्रतिनिधी ।
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. या निवडणुकीसाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-काँग्रेस नेत्यांचे पॅनल करण्यात आले आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांनी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे.
आमदार कल्याणशेट्टी यांनी भाजप आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनाही पॅनलमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख पुन्हा स्वतंत्र लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गेल्या निवडणुकीवेळी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलला काँग्रेसच्या दिलीप माने यांनी पाठिंबा दिलेला. तर आमदार सुभाष देशमुख विरोधात लढले होते.
भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हटलं की, आम्ही मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढतोय. यात कोणत्याच पक्षीय राजकारणाचा विषय नाही. दोन्हीही देशमुख आमचे नेते आहेत. त्यांनाही सोबत यायचे आवाहन केले आहे. जास्त लोकांनी अर्ज केल्याने बिनविरोध होणं कठीण आहे. मात्र, आम्ही तरीही त्यादृष्टीने प्रयत्न करत आहोत.
काँग्रेस नेते दिलीप माने म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सचिनदादांना सूचना केल्या होत्या. त्यांनी आम्हाला आवाहन केले आणि आम्हीही तयारी दर्शवली. त्यामुळे एकत्र लढण्याचा निर्णय झाला. बाजार समितीचे हित हेच आमचे लक्ष्य आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे, की आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या निवडणुका सुरू आहेत. नेत्यांनी कार्यकर्त्यांसाठी आता परिश्रम घ्यावे. त्यानुसार मी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी लढणार आहे. मला बाजार समितीच्या निवडणुकीत यावे म्हणून आवाहन केले आहे. तेथे जर सर्वच भाजपचे कार्यकर्ते असतील तर मी यायला तयार आहे असं आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.