देशाच्या रक्षणासाठी काँग्रेस हाच पर्याय

प्रशांत यादव यांचे प्रतिपादन
। चिपळूण । वार्ताहर ।
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीतून भारतीय संविधानात साकारण्यात आलेल्या भारत देशाच्या रक्षणासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन चिपळूण तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये वरची बावशेवाडी येथील बौद्धविहारमध्ये आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते होते.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार निगम यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर विविध पक्ष कार्यरत झाले असून पक्षविस्तारासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. याच दृष्टिने शहरातील क्रमांक 10 प्रभागात काँग्रेसच्या सदस्य नोंदणी मोहिमेची सुरूवात करण्यात आली असून, आयोजित बैठकीत देशहितासाठी विधायक पद्धतीने कार्यरत असणार्‍या काँग्रेसचा हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन प्रशांत यादव यांनी केले.
याप्रसंगी ते म्हणाले की, आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बैठका घेत नाही. निवडणुका येतील आणि जातील. मात्र, काँग्रेस हा त्यागाचा पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या हक्कांवर गदा येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याविरोधात काँग्रेस देशभर लढा देत आहे. आपल्याला संघर्ष करावा लागला, तरी चालेल मात्र बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली घटना आपल्या भावी पिढीसाठी अबाधित ठेवण्याचे काम आपल्याला करावे लागेल.
याशिवाय, सदस्य नोंदणी मोहीम म्हणजे केवळ पक्षातील सदस्यांची संख्या वाढविण्यासाठी नाहिये. या मोहिमेच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणून देशात अराजकता माजविणार्‍या शक्तींविरोधात लढा देणे, हे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटीतपणे काम करणे गरजेचे आहे. शहराच्या विकासासाठी काँग्रेसचे नगरसेवक प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी आपल्याला भक्कम फळी उभी करायची आहे, असेही यादव म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी बौद्धविहाराच्या रखडलेल्या कामाला गती मिळावी, यासाठी वैयक्तिक पातळीवर 25 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. बौद्धविहारसारख्या समाजमंदिरांच्या माध्यमातून एक चांगला समाज घडत असतो, याच भावनेतून ही देणगी देत असल्याचे यादव यांनी सांगून पक्षाच्या आणि विविध संस्थांच्या माध्यमातून बौद्धविहारसाठी भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, नगरसेवक कबीर काद्री, जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, वासुदेव सुतार, अन्वर जबले, गुलजार कुरवले, निर्मला जाधव, श्रद्धा कदम,भक्ती कुडाळकर, स्नेहा आमले, रुपेश आवले, मुन्ना दळी, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version