कै.गोकुळशेठ पाटील यांच्या निधनाने हळहळ
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल काँग्रेसचे लढाऊ नेते कै.गोकुळशेठ पाटील यांचे शुक्रवारी (दि.16) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी रोडपाली गाव येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते पनवेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांचे वडील असून राजकारणासह सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती.
रोडपाली गावच्या स्मशानभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेससह इतर पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सामाजिक, शैक्षणिक आदि क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. गोकुळशेठ पाटील हे रोडपाली गावचे दहा वर्ष सरपंच होते. त्याचबरोबर पनवेल काँग्रेस तालुकाध्यक्षपदी त्यांनी तब्बल वीस वर्ष निष्ठेने व तितक्याच धडाडीने काम केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.बॅ.ए.आर.अंतुले यांचे ते निकटवर्तीय होते. त्याचबरोबर काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे ते विश्वासू कार्यकर्तेही होते. अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्षाविषयीची निष्ठा अबाधित राखून त्यांनी पक्षसंघटना वाढीसाठी कसोशीने प्रयत्न केले व खडतर परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन गावोगावी प्रचार केला.
ह.भ.प.कै.गोकुळशेठ पाटील यांचा राजकारणासह पारमार्थिक कार्यक्रमात विशेष सहभाग असायचा. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, दानशूर वृत्ती असून गावातील गरजू ,गरीब लोकांना नेहमीच ते सढळ हस्ताने मदतीचा हात द्यायचे. गावातील लहानांपासून मोठ्यापर्यंत त्यांच्या प्रति आदर होता. कै. गोकुळशेठ पाटील यांनी सिडकोच्या माध्यमातून शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे तसेच कामगार व गोरगरिबांचे विविध प्रश्न सोडवले. त्या काळात पनवेलसह रायगड जिल्ह्यात काँग्रेसची संघटना खेडोपाडी व तळागाळात पोहोचवण्यासाठी कै. गोकुळशेठ पाटील यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनवार्तेने समस्त पाटील कुटुंबीयांसह रोडपाली गाव, पनवेल व रायगड काँग्रेसमध्ये शोककळा पसरली आहे.







