काँग्रेसचे नेते रोहिदास पाटील यांचे निधन

| मुंबई | प्रतिनिधी |

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी (दि.27) सकाळी 11 च्या सुमारास निधन झाले. निधनसमयी ते 84 वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी (दि. 28) सकाळी 11 वाजता नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील निवासस्थानापासून निघेल. आणि एसएसव्हीपीएस कॉलेज ग्राऊंडवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंत्यदर्शन शनिवारी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात घेता येईल. त्यांच्या पश्‍चात मुलगा धुळ्याचे आमदार कुणाल पाटील, विनय पाटील आणि मुलगी स्मिता पाटील असा परिवार आहे. कोल्हापुरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे ते सासरे होत. काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते म्हणून पाटलांची ओळख होती. रोहिदास पाटलांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्याचे पद भूषवले होते. धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. काँग्रेसचे महत्त्वाचे नेतेदेखील या अंत्यविधीला येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version