काँग्रेस नेते थोरात, पटोले यांचे मनोमिलन

वाद नव्हताच,प्रसारमाध्यमांनी वाढविला; उभयतांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन

| मुंबई | प्रतिनिधी |

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी आणि विजयावरुन काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात निर्माण झालेल्या राजकीय वादावर उभयतांनी पडदा टाकला आहे.आमचे कुठलेच वाद नव्हते, प्रसारमाध्यमांनी ते ताणवून धरले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

बाळासाहेब थोरात नाना पटोले या दोन्ही बड्या नेत्यांच्या उपस्थित पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी नाना पटोले यांना थोरांतासोबत मनोमिलन झालं का? असा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले आणि थोरात या दोन्ही नेत्यांनी उत्तर दिलं. विशेष म्हणजे अतिशय हसत-खेळत आणि उत्साहाच्या वातावरणात ही पत्रकार परिषद पार पडली. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच.के. पाटील यांना महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वादावर पडदा पाडण्यात यश आल्याचं चित्र आहे.

मी सुरवातीलाच प्रश्‍न उपस्थित केला होता. मी सांगितलं की आमच्या काँग्रेस पक्षात कुठेही कुठलाही वाद नाही. नागपूर आणि अमरावतीची निवडणूक जिंकण्यासाठी केलेलं एक वातावरण होतं. मी सुरवातीलाच प्रदेशाध्यक्ष म्हणून सुतोवाच केलेलं होतं की आमच्यात कोणताही वाद नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. बाळासाहेबांनी सुद्धा परवा सांगितलं की, आमच्यात कुठलाही वाद नाही. पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हा प्रयत्न फोल ठरला आहे. आता कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागा आम्ही जिंकू, असा दावा नाना पटोले यांनी यावेळी केला.

बाळासाहेब थोरात यांचा अपघात झाला. एच.के. पाटील पहिल्यांदा मुंबईत आले तर त्यांच्या घरी गेले. ते सर्वच नेत्यांना भेटले. पण त्यांचा अपघात झाल्याने ते त्यांच्या घरी जाऊन भेटले. तुम्ही समज केला की ते बाळासाहेबांची मनधरणी करायला गेले. आता त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून गेले. मी हेच सांगू इच्छितो की, काहीच वादविवाद नाही, असं पटोलेंनी स्पष्ट केलं.

यावेळी पत्रकारांनी पटोले यांना थोरातांच्या राजीनाम्याविषयी आणि नाराजीच्या पत्राविषयी प्रश्‍न विचारले. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरातांनी नाराजीचं पत्र पाठवलं तर त्या पत्राची एक कॉपी तरी दाखवा. त्यांच्या राजीनाम्याचं पत्र तर दाखवा, असं उत्तर दिलं. यावेळी बाळासाहेब थोरात यांना विचारण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला तेव्हा अध्यक्षांनी चर्चा राष्ट्रीय पातळीवर नेली. तुम्ही खाली कशाला नेता? असं म्हणत बोलणं टाळलं.

मी नाराज होतो, हे कोणी सांगितले. मला माध्यमांकडूनच समजत आहे की मी नाराज होतो. मी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही. पत्रव्यवहार हा प्रत्येक संघटनेत चालतो, तो मी देखील केला.

बाळासाहेब थोरात, काँग्रेस
Exit mobile version