| मुंबई | दिलीप जाधव |
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीची नोटीस पाठवून दडपशाही करणार्या केंद्र सरकारविरोधात सोमवारी मुंबई, नागपूर येथील ईडी कार्यालयावर काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे सर्व मंत्री,प्रदेश कार्यकारिणीचे नेते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागपूरतही ईडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार मनमानी व अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही व घाबरणारही नाही. काँग्रेस पक्ष, सोनिया व राहुल गांधी हुकूमशाही सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे परंतु अशा हुकूमशाहीला काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चोख उत्तर देईल. हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे, असा इशारा पटोले यांनी दिला .







