काँग्रेसला नेतृत्व हवंय

दीडशे वर्षाची परंपरा लाभलेल्या राष्ट्रीय काँग्रेसची देशभरात आजमितीस गलितगात्र अवस्था झालेली आहे. कधीकाळी अवघ्या देशावर राज्य करणार्‍या काँग्रेसला आज मात्र सत्तेपासून दूर ठेवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप यशस्वी झाला असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. अशावेळी तारणारे नेतृत्व पक्षाला मिळणे गरजेचे आहे. यासाठी येत्या 17 ऑक्टोबरला देशभरात काँग्रेस अध्यक्षांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुुकीत कोण उभे राहणार आहे हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. त्यानंतर खरंच मतदान होणार की पुन्हा एकदा गांधी घराण्याकडेच काँग्रेसची सूत्रे सोपविली जाणार हे उघड होणार आहे. देशात काँग्रेसचा विचार मानणारे कार्यकर्ते आजही गल्लीपासून दिल्लीपर्यंत कार्यरत आहेत. मात्र त्यांना योग्य दिशा देणारे नेतृत्वच नसल्याने या पक्षाची अवस्था भरकटलेल्या तारुसारखी झालेली आहे. आतापर्यंत काही अपवाद वगळता काँग्रेसचे नेतृत्व नेहरु, गांधी घराण्यानेच केले. सोनिया गांधी यानी प्रकृतीच्या कारणास्तव पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वीच राहूल गांधींकडे दिली खरी, पण राहूल यांना पक्ष वाढविण्यात यश आलेच नाही. उलट त्यांचे नेतृत्वच कुचकामी ठरल्याचे वेळोवेळी झालेल्या विविध निवडणुकांवरुन स्पष्ट झालेले आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्षाला दारुण पराभवालाच सामोरे जावे लागलेले आहे. या कमकूवत नेतृत्वाचा फायदा मोदींनी यांनी घेत अवघा देशच भाजपमय करुन टाकला आहे. त्यात आता गेली अनेक वर्षे पक्षात कार्यरत असणारी गुलाम नबी आझाद यांच्यासारखी ज्येष्ठ नेतेमंडळीही पक्षाला रामराम ठोकून जात आहेत. अर्थात अशा कठीण प्रसंगी गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नेतेमंडळींनी पक्ष सोडणे हे योग्य नव्हते. ज्या पक्षाने आपल्याला राजकीय महत्व मिऴवून दिले त्या पक्षाला पडछडीच्या काळात असे वार्‍यावर सोडून जाणे कितपत योग्य आहे. याचा विचार गुलआझादांनी करणं उचित ठरेल. राहूल गांधींच्या अपयशी नेतृत्वामुळे पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळी यापूर्वीच नाराज झालेली आहे. त्यामुळे पक्षातच नाराज गट तयार झालेला आहे. त्यांना त्यांचे नेतृत्व कुचकामी वाटू लागल्याने गांधी घराण्याशिवाय अन्य कुणाकडे तरी पक्षाची धुरा सोपविली जावी, अशी मागणी जोर सातत्याने होत आहे. पण गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्यांना त्या परिवारातीलच कुणीतरी पक्षाचे अध्यक्ष असावे असे वाटत असल्याने काँग्रेसमध्येच मतभेद निर्माण झाल्याचे सातत्याने दिसत आहे. याचा परिणाम सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर होत असल्याने पक्षाचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत अध:पतन झालेले आहे. यातून सावरायचे कसे याचीच चिंता आता पक्षाला लागलेली आहे. आणखी दोन वर्षानी देशात लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत तरी काँग्रेसला तारु शकेल असे कणखर नेतृत्व मिळणे गरजेचे आहे. जर ते मिळाले नाहीतर 2024 च्या मध्यावधी निवडणुकीत उरलीसुरली काँग्रेसही नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. याचाच फायदा मोदी आणि भाजप घेत आहेत. सन 2014 मध्ये सत्तेवर येताना मोदींनी काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा केली होती आणि गेल्या आठ वर्षात जिथे जिथे काँग्रेसचे प्राबल्य आहे तेथे त्यांना नामशेष करण्यात मोदी यशस्वी झाल्याचे दिसत आहे.देशात काँग्रेसची सत्ता असलेल्या बहुतांशी राज्यात आता भाजपची सत्ता आहे. अनेक राज्यात तर तेथील प्रादेशिक पक्षांमध्ये फोडाफोडी करुन भाजपने आपले वर्चस्व दाखवून दिलेले आहे. हे असेच चालू राहिले तर अवघा देश भाजपमय व्हायला वेळ लागणार नाही. मोदींचा हा उधळलेला वारु रोखायचा असेल तर काँग्रेसला पुन्हा एकदा उभारी घेणे गरजेचे आहे. कारण काँग्रेसची मुळ ही देशात सर्वत्र पसरलेली आहेत. फक्त त्या मुळांना योग्य ते खत घालणारे कणखर नेतृत्व मिळणे गरजेचे आहे. यासाठी पक्षाने सर्वमान्य नेतृत्व शोधून धुरा सोपविली पाहिजे. आता 17 ऑक्टोबरला गावपातळीपासून देशपातळीपर्यंत काँग्रेस अध्यक्षपद निवडीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे काँग्रेसवर निष्ठा असलेल्या आणि भाजपला रोखावे वाटते अशा काँग्रेसच्या मतदारांनी आपली सदसदविवेकबुद्धी जागरुक ठेऊन अध्यक्ष निवडावा आणि काँग्रेसला वाचवावे. अन्यथा पक्षाबरोबरच मतदाररुपी काँग्रेसजनही संपून जातील हे नाकारु नका.

Exit mobile version