। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गुजरातचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच संपन्न झालेल्या काँग्रेस चिंतन शिबिरात त्या सहभागी झाल्या होत्या. या चिंतन शिबिरामध्ये काँग्रेसचे देशभरातील नेते आणि पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी देखील करोनाची चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोनिया गांधी यांना काल संध्याकाळी अर्थात बुधवारी सौम्य ताप आला होता. त्यामुळे करोनाची लक्षणे दिसत असल्याचे लक्षात येताच त्यांची करोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यानंतर सोनिया गांधींना विलगीकरणात ठेवण्यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ताप आल्यानंतर सोनिया गांधी तातडीने लखनऊहून दिल्लीत परतल्या असल्याचे सांगितले जात आहे.