तेलंगणात काँग्रेस परतली

| हैद्राबाद | वृत्तसंस्था |

राज्यामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. काँग्रेसने या ठिकाणी तब्बल दहा वर्षानी सत्ता काबीज केली आहे. भारत राष्ट्र समितीचा (बीआरएसला) काँग्रेसने चांगलाच झटका दिला आहे. 119 विधानसभेच्या जागेसाठी निवडणूक पार पडली होती. आजच्या निकालामध्ये काँग्रेसचे 68 जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाचे 36 उमेदवार, तर भाजपाचे 10 उमेदवार विजयी झाले आहेत.

कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये काँग्रेस आता स्वबळावर सत्तेवर येणारा पक्ष ठरला आहे. तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले रेवंत रेड्डी या निवडणुकीत पक्षाचा प्रमुख चेहरा राहिले आहेत. रेड्डी हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. रेवंत रेड्डी हे 17 व्या लोकसभेचे सदस्य आहेत. याआधी रेड्डी हे चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षात होते. टीडीपीकडून आमदारकी लढवताना रेड्डी यांनी पाच वेळा आमदार असलेले तत्कालीन काँग्रेस नेते गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला होता. 2014 सालीही त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर 2017 मध्ये त्यांनी टीडीपीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात पकडला. काँग्रेसने रेवंत रेड्डी यांना 2021मध्ये प्रदेशाअध्यक्ष केले होते.

एकूण जागा-119; बहुमत- 60
काँग्रेस- 68
बीआरएस- 36
भाजपा- 10
Exit mobile version