। नेरळ । वार्ताहर ।
भाजप काँग्रेसबाबत विविध माध्यमातून अपप्रचार करत असून महागाईच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भावनात्मक मुद्द्यांना उचलून धरत आहे. अशा या भाजपचे अपप्रचार रोखून त्यांना चोख प्रत्युत्तर द्या तसेच काँग्रेसने आजवर समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी केलेल्या कामाचे महत्त्व पटवून द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष चारुलता टोकस यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.
कर्जत तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य नोंदणी आढावा बैठकीचे आयोजन साळोख तर्फे वरेडी येथे करण्यात आले होते. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष चारुलता टोकस, अखलाक शिलोत्री, किरीट पाटील, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा अध्यक्ष रियाज बुबेरे, जिल्हा सरचिटणीस प्रमोद राईलकर, माजी सरपंच आवेश जुवारी, मुकेश सुर्वे, तालुका कार्याध्यक्ष संजय गवळी,युवक तालुका अध्यक्ष मनीष राणे, व्यापारी फेडरेशन तालुका अध्यक्ष अरविंद कटारिया, साळोख ग्रामपंचायत सदस्या मनीषा शिनारे, ललिता कांबरी, इस्माईल दिवाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.







