काँग्रेस-वंचितची युती

| मुंबई | प्रतिनिधी |

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी मुंबईत युतीची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या समीकरणामुळे मुंबई महापालिकेच्या रणांगणात आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकतंच वंचित बहुजन आघाडीने एक प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे. या अधिकृत पत्रानुसार, मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांपैकी 62 जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. तर उर्वरित जागांवर काँग्रेस आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. विशेष म्हणजे, या 62 जागांच्या यादीवर दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सही असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यात आता कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या युतीचे स्वागत करताना सांगितले की, काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. 1999 नंतर राजकीय कारणांमुळे हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत होते, मात्र तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष मुंबईच्या विकासासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून विचारांची आघाडी असल्याचे त्यांनी नमूद केले.

Exit mobile version