| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
डिझेल, पेट्रोलसह गॅसच्य किमतीमध्ये सरकारकडून भरमसाठ वाढ करण्यात आली. त्याविरोधात अलिबागमध्ये काँग्रेसच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जनतेच्या न्याय्य हक्कासाठी शुक्रवारी सायंकाळी रस्त्यावर उतरले. यावेळी काँग्रसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर जनआंदोलन केले.
यावेळी काँग्रेसचे दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मनीष पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष (पनवेल शहर) डॉ. श्रुती म्हात्रे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य भास्कर भोपी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते शुक्रवारी (दि. 29) दुपारी काँग्रेस भवनसमोर एकवटले. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी अलिबाग शहरात मोर्चा काढला. भाजपच्या कार्यालयासमोर सरकारविरोधात निदर्शने केली. भाजप सरकारद्वारे देशात वाढविण्यात येत असलेल्या महागाईविरोधात तसेच देशभरात होत असलेल्या इंधन तुटवड्याविरोधात उग्र जनआंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात घोषणा देत महागाईविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. या आंदोलनात बेलोशीपासून वेगवेगळ्या भागातील काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते, सामान्य नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सरकारच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसच्या काळात चुलीवरून प्रत्येक घराघरात गॅस पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भाजपच्या काळात गॅसवरून आता चूल पेटविण्याची वेळ नागरिकांवर आली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. रॉकेलचे दरही गगनाला भिडले आहेत. चूल पेटवणेदेखील कठीण झाले असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर मोठे संकट उभे राहिले आहे. जनतेसाठी हा लढा असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.
महागाईविरोधात काँग्रेसचे जनआंदोलन
