आगामी निवडणुंकाच्या पार्श्वभूमीवर आयोजन
महागाईविरोधात लढण्याचा निर्धार
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस देशव्यापी जनजागरण अभियान राबविणार असल्याची माहिती समोर येते आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत घोषणा केली आहे.
यासंदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन समितीची बैठक नुकताच झाली. यानुसार, 14 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार असून, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली वाढ आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींविरोधात जनजागृती मोहीमेसंदर्भात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वांनी शेती आणि शेतकर्यांवर होणारे हल्ले, अभूतपूर्व बेरोजगारी, वाढती महागाई या विरोधात लढण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला, असल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले होते. यामध्ये काँग्रेसने पक्षाचे खासदार, आमदारांच्या नेतृत्वाखाली 14 नोव्हेंबरपासून केंद्राच्या विरोधात पदयात्र, प्रभातफेरी काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा राज्यातील निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये अशाच सभा घेऊ शकतात. यासंदर्भात, पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांना देशाच्या विविध भागांना भेट देण्यास सांगितले आहे. प्रचाराच्या शुभारंभाच्या अगोदर, काँग्रेस 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान वर्धा, महाराष्ट्र येथे कार्यकर्त्यांच्या गटासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये, अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि कृषी यांसारख्या क्षेत्रातील तज्ञांकडून जनसामान्यांपर्यंत कसे पोहोचायचे आणि त्यांना प्रभावित झालेल्या समस्यांना कसे स्पर्श करायचे, याचे प्रशिक्षण दिले जाईल.
तसेच, भाजपाच्या राजवटीत इंधनाच्या किमती वाढणे, महागाईचे परिणाम, कृषी कायदे आणि बेरोजगारी यासंबंधीची आकडेवारी पक्ष कार्यकर्त्यांकडे असेल.







