‘बा रायगड’ परिवाराची किल्ल्यावर संवर्धन मोहीम

जंगलात सापडले ऐतिहासिक अवशेष
। सुधागड -पाली । वार्ताहर ।
‘बा रायगड’ परिवार च्या सदस्यांनी नुकतीच सुधागड किल्ल्यावर संवर्धन मोहीम राबविली. यावेळी जंगलात एका दगडी जात्याचा खालचा भाग सापडला आहे. हा अवजड भाग पंत सचिव वाड्यात सुखरूपपणे आणून ठेवला आहे. मोहिमेत एक तरुणी देखील सहभागी झाली होती.


या मोहिमेत सुधागड किल्ल्यावरील पंत सचिव वाड्याजवळ असलेल्या विहिरीवर पत्र्याचे तात्पुरते आवरण टाकण्यात आले आहे. जेणेकरून त्यामध्ये कचरा, माती व पालापाचोळा जाऊ नये. तसेच पावसाच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी तळ्याशेजारी असलेल्या महादेवाच्या मंदिरावर तात्पुरते छत टाकण्यात आले आहे. या मोहिमेत सापडलेल्या जात्याचा खालचा अवजड भाग बा रायगड परिवाराच्या सदस्यांनी दोरीने बांधून लोखंडी रॉडला लावून खांद्यावरून वाड्यावर नेला आहे. हे काम खूप कठीण व दमछाक करणारे होते.


जंगलातून जात्याचा वरील भाग शोधण्यासाठी आगामी काळात मोहीम राबविण्यात येणार आहे. असे बा रायगड परिवाराचे सदस्य दत्तात्रेय सावंत यांनी सांगितले. तसेच हे जाते व्यवस्थित ठेवण्यात आले आहे. या अवशेषाला ऐतिहासिक महत्व आहे. या मोहिमेत दत्तात्रेय सावंत,दुर्वेश शिराळकर, योगेश साजेकर, रिया रॉय, स्मित कदम व सागर सावंत आदी बा रायगड परिवाराचे सदस्य सहभागी झाले होते.

Exit mobile version