उरण तालुक्यातील 2200 हेक्टर कांदळवनाचे संवर्धन वनविभागाकडे

| उरण | प्रतिनिधी |

राज्याच्या वन विभागाने उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, गोवठणे, जुई, जसखार, धुतुम, भोम, चिखली भोम, पिरकोन, धसाखोशी, वशेणी, विंधणे, पागोटे, पौंडखार, भेंडखळ, नवघर व वालटी खार या 17 गावांच्या हद्दीतील 2200 हेक्टर खारफुटीचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी वन विभागाकडे देण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या खारफुटीचे जतन होणार आहे. खारफुटींना मुंबई उच्च न्यायालयाच्या समुद्री वनस्पतींना संरक्षित जंगलांच्या स्वरुपात वाचविण्यासाठी दिलेल्या आदेशाप्रमाणे जतनासाठी वन विभागाला सुपूर्द करण्यात येणार आहे.

जतन करायच्या या खारफुटींचे उरणमधले क्षेत्र सुमारे 2200 पेक्षा जास्त हेक्टरांचे म्हणजेच अंदाजे 220 आझाद मैदानांना सामावून घेण्याएवढे आहे. रायगड जिल्ह्यातल्या उरण मधील प्रक्रियेचे स्वागत करताना नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार म्हणाले नवी मुंबई सेझच्या अंतर्गत असलेल्या 1,250 हेक्टरांपैकी बहुतांश भाग एकतर खारफुटींच्या किंवा पाणथळ क्षेत्रांच्या अंतर्गत येतो. याची देखील दखल घेतली जाणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.

समुद्री वनस्पतींच्या स्थानांतरणात होणार्‍या उशीरामुळे व्यापक विध्वंस होऊ शकतो.नवी मुंबई सेझमध्ये सिडकोचा 26% वाटा असल्यामुळे , सिडको देखील या क्षतीला तेवढीच जबाबदार आहे.

बी.एन.कुमार

या आधी महसूल विभागाने वन विभागाला 2015 मध्ये 25 हेक्टरांहून जास्त सुपूर्दगी केली होती आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये 42 हेक्टर आणि जुलैमध्ये 1100 हेक्टर स्थानांतरणाची सूचना देण्यात आली होती असे वन अधिका-यांनी सांगितले. या व्यतिरिक्त जे.एन.पी.टी.ने 814 हेक्टरांहून जास्त खारफुटींची सुपूर्दगी केली.

अधिकारी म्हणाले 300 हेक्टर्स एवढ्या खारफुटी बहुतांशपणे सिंचन न झालेल्या शेत जमिनींवर असून त्यांची सिडकोने दखल घेणे अजून बाकी आहे. याबद्दल स्थानिक शेतकर्‍यांसोबत मतभेद आहेत. या दरम्यान वनशक्तीची समुद्री शाखा असलेल्या सागरशक्तीचे नंदकुमार पवार यांनी जे.एन.पी.टी.ने देखील आपल्या जवळ सुमारे 100 हेक्टर खारफुटी ठेवल्या आहेत. यांना देखील वन खात्याला सुपूर्द करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version