माथेरानमध्ये जैवविविधतेचे संरक्षण

| माथेरान । वार्ताहर ।
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या माथेरानच्या जवळपास 400 हेक्टर जमिनीवर जंगल आहे, तर शहराच्या माथ्यावर 300 हेक्टरचा परिसर घनदाट जंगलाने वेढला आहे. या ठिकाणी असलेल्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी शेकडो पर्यटक वर्षभर येत असतात. मात्र काहींकडून जंगल परिसरात कचरा टाकणे, झाडांना इजा पोहोचण्याचे प्रकार घडत असल्याने अशा व्यक्तींविरोधात वनविभागाने कंबर कसली आहे.

रात्रीच्या वेळी पूर्वसूचना न देता, शहराबाहेरील नागरिक जंगलात फिरताना आढळल्यास, त्यांच्यावर वन विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी जे पर्यटक जैवविविधतेला हानी पोहोचवतील, अशांवर वन विभागाची करडी नजर असेल. यासाठी स्थानिक संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे. जून महिना हा वेगवेगळ्या प्रजातींचे साप, पाल, बेडूक, कीटक आदींचा प्रजनन काळ असतो. याचा फायदा घेत काही महाविद्यालयायीन विद्यार्थी जीवशास्त्राचा भाग सांगून जंगल परिसरात स्वैराचार करतात. यातील काही त्याचा शैक्षणिक उपयोग करतात, तर काही रात्रीच्या वेळी साप पकडून नेतात; मात्र यामुळे परिसरातील जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version