| छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था |
राज्यातील शिवकालीन 350 किल्ल्यांचे संवर्धन करण्यास ‘फोर्ट फेडरेशन’ ही संस्था तयार आहे. यातील 25 किल्ले व्यक्तिगत पातळीवर संवर्धनासाठी द्यावेत, अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी खंत संभाजाराजे छत्रपती यांनी येथे व्यक्त केली.
गड-किल्ले संवर्धनासाठी जिल्हा नियोजन समितीतून तीन टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी काही झालेली नाही. त्यात अनेक लालफितीच्या अडचणी आहेत. त्यामुळे अनेकांना किल्ले संवर्धनासाठी देता यावेत यासाठी त्याच्या संवर्धनाची एक मार्गदर्शिका पुरातत्व विभागाच्या वतीने करावी, अशी मागणी करुनही फारसा उपयोग झाला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सागरी किल्ल्यांची पर्यटकांना सफर घडवून आणणारी योजनाही तयार आहे. पण, त्याकडेही कोणी लक्ष देत नाही. मुंबई ते रायगड या समुद्रमार्गावर खांदेरी, उंदरी, कुलाबा, पद्मदुर्ग, मुरुड-जंजिरा आणि काशीद असे किल्ले आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून ते या भागांना जोडता येतील, असेही ते म्हणाले.
या योजनेवर महाराष्ट्र सागरी मंडळानेही काम केले आहे. तसेच, केंद्र सरकारही या योजनेवर खर्च करण्यास तयार आहे. सारे काही असताना त्यावर कोणी काही करत नाही. या अनुषंगाने सांस्कृतिक मंत्री, सचिव किंवा पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यास तयार आहोत. पण या कामाला कोणी हात घालत नाही, असे सभांजीराजे म्हणाले. समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधी होणार हे माहीत नाही. परंतु, समुद्रातील हे किल्ले आणि त्याच्याभोवती पर्यटन उभे करणे सहज शक्य आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सागरी वाहतुकीच्या परवानग्याही आता मिळविल्या आहेत, असेही ते म्हणाले.