मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा कट; गुप्तचर यंत्रणेची माहिती

सुरक्षेत वाढ, आत्मघातकी स्फोटाने
| मुंबई | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका असून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाल मिळाली आहे. आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहीती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे पोलिस सतर्क झाले असून या संबंधी तपास सुरू आहे. महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर धमकीचा एक निनावी फोन देखील आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून त्याचा या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. या आधी नक्षलवाद्यांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धमकी आली होती. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्ववादी सरकार ज्या दिवसापासून राज्यात आलं आहे तेव्हापासून अनेकांच्या पोटात दुखत असून त्या लोकांना अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. पण अशा प्रकारची प्रवृत्ती आता ठेचून काढली जाईल. याच्या मुळाशी कोण आहे याचा तपास केला जाईल.

गृहविभाग आणि पोलिसांनी याबाबत दक्षता घेतली आहे. नक्षलवादी आणि देशविघातक शक्तींनी यापूर्वी अशा प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या. मुख्यमंत्री नसताना देखील असे प्रकार घडले आहेत. मी जनतेत जाणारा माणूस आहे, मला जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.माझ्या सुरक्षेसाठी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत.

– एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री




कायदा, सुव्यवस्थेसाठी शिवाजी पार्क सोडले
आमच्या पदाधिकार्‍यांची, खासदार, आमदारांची शिवाजी पार्कवर मेळावा व्हावा, अशी मागणी होती. मुख्यमंत्री म्हणून मी त्यात हस्तक्षेप केला नव्हता. मी हस्तक्षेप केला असता तर मैदान मिळालं असतं. मी राज्याचा मुख्यमंत्री देखील आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये ही जबाबदारी आमची देखील आहे. आमच्या काही सहकार्‍यांची सुप्रीम कोर्टात जाण्याची इच्छा होती. मात्र, राज्याचा प्रमुख म्हणून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं आवश्यक असल्यानं दुसर्‍या मैदानावर मेळावा घेणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

Exit mobile version