| जालना | प्रतिनिधी |
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आणि त्यांच्या विरोधात कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत गंभीर तक्रार जालना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची तातडीने दखल घेत जालना गुन्हे शोध पथकाने वेगाने तपासचक्र फिरवली. तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून, जालना पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ही तक्रार दिली असून, बीडमधूनच हा कट रचला गेल्याचं प्राथमिक माहितीनुसार समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. या कटामध्ये कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असून, त्यासंदर्भात व्हिडिओ आणि इतर पुरावे मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे. जालना पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, लवकरच यातील सत्य समोर येण्याची शक्यता आहे.






