| मुरूड जंजिरा | वार्ताहर|
मुरुड तालुक्यातील नांदगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दांडेतर्फे नांदगाव येथील सुमारे अडीच एकर सरकारी भूखंडाची विक्री मुंबईतील एका धनिकास करण्यात आली आहे. आता त्या जमीनीवर तारेचे कुंपण घालण्याचा डाव नांदगावमधील एका राजकीय नेत्याने केल्याचे जोरदार चर्चा आहे.
सदर भूखंड नांदगाव ग्रामपंचायतीला डंपिंग ग्राऊंडसाठी मिळावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने 18 डिसेंबर 2020 रोजी नांदगावच्या तलाठी तथा मंडळ अधिकार्यांकडे एका अर्जाव्दारे केली होती. त्यानुसार नांदगावच्या तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यांनी 12 मे 2022 रोजी एका अर्जाव्दारे मुरुडच्या तहसीलदारांना कळविले होते. मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांचा अहवाल तहसील कार्यालयास सादर केला आहे. सहायक नगररचनाकार यांच्या कडील पत्रात मौजे दांडेतर्फे नांदगाव हे गाव मंजूर रायगड प्रादेशिक योजनेच्या नकाशा नुसार शेती विभागात आणि वन विभागात समाविष्ट आहे. त्यामुळे ही जमीन वन विभागात समाविष्ट आहे किंवा कसे, याची स्पष्टता होत नाही. तसेच सिआरझेड नकाशा नुसार हा भाग सीआरझेड -1 व सीआरझेड – 3 मध्ये समाविष्ट आहे. सीआरझेड नियमा नुसार सदर अधिसूचित क्षेत्रात डंपिंग ग्राऊंड हा वापर प्रतिबंधित केलेला असल्याने सदर भूखंडाचा वापर अनुज्ञेय होणार नाही. सदर जागा हस्तांतरित करणे शक्य नाही. त्यासाठी दुसऱ्या जागेचा विचार करावा, असे नांदगाव ग्रामपंचायतीला कळविण्यात आले आहे.
डंपिंग ग्राऊंडसाठी जर सीआरझेड कायद्याचे बंधन असेल तर, सदर जागेच्या बाजुच्या अन्य जागांवर समुद्रा लगत खारफूटी वनस्पतीची कत्तल करून समुद्रात घुसून अनधिकृत बांधकामांना कायदा शिथिल आहे का. अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून शासकीय जागा घनिकाच्या घशात जाण्यापासून वाचवणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.