| पनवेल | प्रतिनिधी |
शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांमधील डेब्रीज मोकळ्या जागेत तसेच रहिवासी वस्तीजवळ टाकण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिमेंटची धूळ आणि बांधकामाचा कचरा वाऱ्यामुळे थेट घरांमध्ये येत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे हा प्रकार पनवेल महानगर पालिका हद्दीतच सुरू असून संबंधित ठेकेदारांवर कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिक करत आहेत. संबंधित ठिकाण हे पनवेल शहर पोलीस ठाणे आणि तहसीलदार कार्यालयाजवळ असल्याने प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. बांधकाम व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून डेब्रीज नियोजित ठिकाणीच टाकावे, अन्यथा कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.







