| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ जवळील बोरले येथील बांधकाम साईट वरील बांधकाम साहित्य चोरीला गेले होते. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी बांधकाम साहित्य चोरणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. चार आरोपींना ठाणे येथून आणण्यात आले असून, त्या आरोपींकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत बोरले रोड लगत ग्लोब फँटासिया साईडमध्ये लोखंडी रॉड व सिमेंट गोणी चोरी झाल्या असल्या बाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. नेरळ पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकाचे वाघमारे, राजाभाऊ केकाण, पोलीस आशू बेंद्रे, वांगणेकर यांनी तपास करताना ग्लोब फँटाशिया साईडमधील सीसीटीव्ह फुटेज तपासले असता ते बंद स्थितीत होते. त्यानंतर सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास व गोपनीय माहितीद्वारे तपास करून आरोपी राकेश लक्ष्मण पारधी, तबारक हुसैन अब्दुल्ला खान, रवींद्र दत्ता कांबळे, अतिश रामचंद्र चहाड यांना पोलीस ठाणे येथे आणले. चोरट्यांना विश्वासात घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी मिळाली. त्यात तपासामध्ये आरोपीत यांच्याकडून 30,000 हजार रुपयाचे लोखंडी रॉड 103600 रुपयाचे 370 सिमेंट च्या गोण्या व चोरी करण्यासाठी वापरलेले महेंद्रा कंपनीचा पिकअप जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपासात पोलीस अधीक्षक रायगड आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे आणि कर्जतचे पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.






