बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सुपूर्द केले स्व.मधूशेठ ठाकूर यांचा गौरव करणारे स्मृतिपत्र

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अलिबाग येथे माजी आ. स्व. मधूशेठ ठाकूर यांच्या कुटूंबियांची निवासस्थानी भेट घेतली. तसेच स्व.मधूशेठ ठाकूर यांचा गौरव करणारे महाराष्ट्र विधानसभा स्मृतिपत्र ठाकूर कुटुंबियांकडे सुपूर्द केले.


यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर, अलिबागचे प्रांत अधिकारी प्रशांत ढगे व अलिबागच्या तहसिलदार मिनल दळवी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अ‍ॅड.प्रविण ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, रविनाना ठाकूर, उमेश ठाकूर यांनी चव्हाण यांचे स्वागत केले. याप्रसंगी अशोक चव्हाण यांनी सांगितले कि, मधुशेठ ठाकूर हे माझे अतिशय जिवलग मित्र होते. महसूल मंत्री तसेच मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना मधुशेठ नेहमी मतदारसंघातील समस्यांबाबत कायम संपर्कात होते. लोकांसाठी कायम कार्यरत असणारा नेता गेल्याने रायगड जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी केलेली समाजकार्ये तसेच काम करायची तळमळ याचा आदर्श येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कायम लक्षात ठेवावा, असे प्रतिपादनही चव्हाण यांनी यावेळी केले.

विधानसभा स्मृतीपत्रामध्ये मधुकर शंकर ठाकूर, माजी वि.स.स. यांच्या दु : खद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते. स्व. मधुकर शंकर ठाकूर यांचा जन्म 15 जुलै, 1 9 47 रोजी रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथे झाला. त्यांनी झिराड ग्रामपंचायतीचे सरपंच, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले होते. चोंढी येथे महाविद्यालयाची स्थापना करुन त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. चोंढी येथील कनकेश्‍वर देवस्थानचे विश्‍वस्त म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केले होते.

अलिबागमधील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. स्व. मधूकर ठाकूर सन 2004 मध्ये अलिबाग मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते, असा गौरव स्व.मधुशेठ ठाकूर यांचा करण्यात आला आहे.

Exit mobile version