। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कडाव ते अंजप गावे जोडणार्या रस्त्यावरील पेज नदीवर अगदी कमी उंचीचा पूल होता. पावसाळ्यातील चारही महिने या पुलावरून पाणी वाहत असल्याने या रस्त्याने वाहतूक करणे कठीण होत होते. स्थानिक रहिवाशी आणि शेतकर्यांची ही अडचण लक्षात घेऊन प्रशासनाकडून या जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
पेज नदी बारमाही वाहणारी नदी असून उन्हाळ्यात देखील टाटा पॉवर हाऊसपासून दुथडी भरून वाहत असते. पावसाळ्यात तर आजुबाजुंच्या लहान ओढ्यांचे पाणि पेज नदीतून वाहत असल्याने पावसाळ्यातील चारही महिने दुथडी भरून वाहत असते. पुढे ही नदी उल्हास नदीला जाऊन मिळते. या नदीवरील अंजप येथे एक पूल असून त्या पुलाची उंची अत्यंत कमी होती. पावसाळ्यात या कमी उंचीच्या पुलावरून पाणी जायचे आणि या भागातील शेतकर्यांची पुलावरून जाण्यासाठी मोठी गैरसोय होत होती. यामुळे स्थानिकांनी या ठिकाणी नवीन पुल बांधण्यात यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. याची दखल घेत प्रशासनाने जुन्या पुलाच्या ठिकाणी जास्त उंचीचा पुल बांधला असून या पुलावरून वाहतूक देखील सुरु करण्यात आली आहे.