| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातून जाणाऱ्या कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ- खांडा गावाच्या हद्दीत असलेल्या लहान पूल वाहतुकीस बंद होता. जून 2025 पासूनचे अखेरीस हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. मात्र, तब्बल आठ महिन्यांनी त्या जागी नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, नवीन पूल बांधण्यासाठी दोन कोटींची निविदा काढली गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, गेली आठ महिने पुलाची निविदा का काढण्यात आली नाही, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ गावातील खांडा येथे माथेरान डोंगरातून वाहून येणारे पाणी जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधण्यात आला आहे. हा पूल किमान 40 ते 50 वर्षे जुना असून, या पुलावरून होणारी वाहतूक ही अनेक वर्षे सुरू आहे. त्यानंतर मागील 10 वर्षेआधी कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण झाल्यावर या लहान पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आला. 27 जून 2025 रोजी सायंकाळच्या वेळी या पुलाचा पाया खचला असल्याचे आणि कोणत्याहीक्षणी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेतल्यावर स्थानिक लोकांनी पूल वाहतुकीस बंद केला. त्यानंतर जवळच असलेल्या नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस तेथे पोहचले आणि पुलाचा पाया याची पाहणी करून पूल वाहतुकीस तात्काळ बंद करण्यात आला.
28 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उरण येथून कर्जत-नेरळ भागात आले आणि पुलाची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी पुलाची स्थिती लक्षात घेऊन पूल वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी त्या पुलावरून कोणतेही वाहन ये-जा करू नये यासाठी लोखंडी पाईप लावून पूल वाहतुकीस बंद केला. त्यानंतर पावसाळा संपल्यावर पुलाचे उभारणीचे काम सुरू होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, पावसाळा संपून चार महिने लोटले तरी पुलाचे बांधकाम सुरू झाले नव्हते. आता दोन महिन्यांनी पुन्हा पावसाळा येणार आहे आणि त्यापूर्वी नवीन पुलाचे काम पूर्ण होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जून 2025 पासून मार्च महिन्याचे पहिल्या आठवड्यापर्यंत हा पूल वाहतूक बंद ठेवण्यात आला होता. या पुलाचे स्ट्रक्चल ऑडिट पावसाळ्यात झाले होते आणि त्यामुळे पुलाच्या नवीन बांधकामासाठी निविदा प्रक्रिया किमान ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणे आवश्यक होती. मात्र, स्थानिक पुलाच्या आसपास होणारी वाहतूक कोंडी आणि समाजमाध्यमे तसेच माध्यमांवर होणारी चर्चा यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे. माथेरानसारख्या पर्यटन स्थळाकडे जाणारे प्रवासी वाहने याच रस्त्याने ये-जा करीत असतात आणि असे असताना पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सर्वांना सामोरे जावे लागत आहे.
या भागात वाहतूक कोंडी आणि वाहनांची कोंडी तेथे होत असून, मागील नऊ महिन्यांत सार्वजनिक बांधकाम खात्याने डोळ्यावर पट्टी बांधली होती. त्या पुलावरून वाहतूक बंद केल्यानंतर बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारे नवीन कामे अथवा कोणत्याही प्रकारची दुरुस्ती कामे हाती घेतली नव्हती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निष्काळजीपणामुळे नेरळ गावात खांडा पुलाच्या परिसरात स्थानिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, आता पुलाचे बांधकाम सुरू झाले असून, पुढील दोन अडीच महिन्यांत नवीन पुलाची उभारणी करण्याचे आव्हान बांधकाम खात्यावर आहे. या तीन खांबांवर उभ्या राहणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामासाठी दोन कोटींचा निधी लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे काय, असा प्रश्न बांधकाम क्षेत्रातील अनेक जाणकार बोलून दाखवत आहेत.







