मुरूडमधील मच्छिमार सोसायटी एकत्र येऊन आंदोलनाच्या पावित्र्यात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
स्थानिक मच्छिमारांना विश्वासात न घेता टोकेखार ते तुरूंबाडी पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. मच्छिमारांच्या रोजगारावर मोठे संकट येण्याची भिती मच्छिमारांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात श्री महालक्ष्मी मच्छिमार सोसायटीसह अन्य सोसायटी आक्रमक झाली आहे. प्रत्येक कुटूंबातील सदस्यांना भविष्यामध्ये उदरनिर्वाहसाठी आर्थिक मदत मिळावी. पुलाचे बांधकाम चालु असेपर्यंत बेरोजगारांना रोजगार मिळावा अशा अनेक मागण्यांसाठी हिंदूस्थान कंस्ट्रक्शन कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापक, जिल्हा प्रशासन व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. अन्यथा मुरूड, एकदरा, राजपूरी येथील असंख्य मच्छिमार सोसायटी एकत्र येऊन पुलाच्या बांधकामविरोधात आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे.
राजपूरी खाडीमध्ये अनेक पिढ्यांपासून उपजिविकेचे साधन म्हणून मासेमारी करून मच्छिमार त्यांचा उदरनिर्वाह चालवित आहेत. मासेमारी हा व्यवसायावर येथील हजारो नागरिक अवलंबून आहेत. मात्र, 2004 मध्ये राजपूरी खाडीमधील दिघी बंदर व आगरदांडा टर्मिनलमध्ये दिघी पोर्टची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे मासेमारीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्याचा विपरीत परिणाम मच्छिमारांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामध्ये आता टोकेखार ते तुरूंबाडी दरम्यान प्रवासी मार्गाच्या पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री हस्ते ऑनलाईन पध्दतीने 13 ऑक्टोबरमध्ये प्रवासी पुलाचे भूमीपूजन करण्यात आले. मुरूड तालुक्यातील टोकेखार आणि म्हसळा तालुक्यातील तुरूंबाडी दरम्यानचा हा पुल राजपूरी खाडीमध्ये असणार आहे. या पुलाच्या बांधकामाबाबत स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या राजपूरी खाडीमध्ये 13 कोळीवाडे येत असून उदरनिर्वाहाचे साधन म्हणून या खाडीकडे पाहिले जाते.खाडीतून होत असलेल्या मासेमारीतून येथील 13 कोळीवाड्यांतील कुटूंबाला मोठा आर्थिक आधार मिळत आहे.
या खाडीवर पुल निर्माण झाल्यास येथील मच्छिमारांवर व कोळीवाड्यांतील नागरिकांवर मोठे आर्थिक संकट येण्याची भिती आहे. रोजगारावर मोठा परिणाम होण्याची चिंता श्री महालक्ष्मी मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष विजय गिदी यांनी व्यक्त केली आहे. भविष्याचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाल्यास मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. खाडीवर जगणारे हजारो कुटूंब उध्वस्त होण्याची होतील. त्यामुळे मच्छिमारांच्या समस्यांचा विचार करून अटल सेतूप्रमाणे तेथील स्थानिक मच्छिमारांना दिलेल्या मोबदल्याप्रमाणे येथील मच्छिमारांना मोबदला देण्यात यावा. प्रत्येक कुटूंबातील सदस्यांना भविष्यामध्ये उदरनिर्वाहसाठी आर्थिक मदत मिळावी. पुलाचे बांधकाम चालु असेपर्यंत बेरोजगारांना रोजगार मिळावा, समुद्रामध्ये कामासाठी लागणाऱ्या नौका मच्छिमारांकडून घेऊन त्यावर काम करणारे कामगार सुध्दा मच्छिमारांचे घेण्यात यावे, प्रत्येक वेळी समाजातील गावांमध्ये कंपनीमार्फत सुख-सोयी पुरविण्यात याव्यात, अशा अनेक मागण्या संस्थेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
अन्यथा श्रीमहालक्ष्मी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी राजपूरी, हनुमान मच्छिमार व्यवसायिक सहकारी संस्था एकदरा, महेश्वरी मच्छिमार सहकारी संस्था एकदरा, जय भवानी मच्छिमार सहकारी संस्था मुरूड- जंजिरा, सागरकन्या मच्छिमार सहकारी संस्था मुरूड-जंजिरा या पाचही संस्था संघटीत होऊन एकत्रीतपणे पुलाच्या बांधकामाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा श्रीमहालक्ष्मी मच्छिमार सोसायटीचे चेअरमन विजय गिदी यांनी दिला आहे. याबाबत हिंदूस्थान कंस्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर, जिल्हा प्रशासन, मुरूड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.







