महिला रुग्णालयाच्या हेरीटेज जागेत बांधकाम

मुरुडकर आंदोलनाच्या पवित्र्यात
| कोर्लई | वार्ताहर |
मुरुडच्या एल.के.बी. (लेडी कुलसुम बेगम) या हेरिटेज इमारती लगत शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 व्या वित्त आयोगांतर्गत ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट (इझकण) नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून, ही इमारत हेरीटेज जागेत असल्यामुळे हे बांधकाम कोणाच्या परवानगीने सुरू आहे, असा सवाल मुरुडकरांना पडला आहे. सदर बांधकाम तातडीने न थांबविण्यात आल्यास मुरुडकर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, संजीवनी आरोग्य संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे, खजिनदार किर्ती शाह, सेक्रेटरी अजित गुरव, हितेंद्र पंड्या, भावेश शाह, प्रज्ञा उमरोटकर, उत्कर्षा धोत्रे, इम्रान शेख, प्रकाश दांडेकर, राजेश मुळेकर, अशोक कमाने अन्य नागरिकांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

ग्रामीण रुग्णालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या नवाबकालीन लेडी कुलसुम बेगम या हेरिटेज इमारतीमध्ये तालुक्यातील नागरिकांकरिता सकाळी 9 ते दुपारी 1 वा.पर्यंत बाह्यरुग्ण सुरु असून, सध्या येथे वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सेवाभावी विचाराने ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण बागुल व सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मकबुल कोकाटे हे विनामूल्य आरोग्य सेवा देऊन शासनास सहकार्य करीत आहेत. सध्या या ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सेवेकडे कोणाचेही लक्ष नाही, परंतु एक आश्‍चर्याची बाब म्हणजे ग्रामीण रुग्णालय एल. के. बी (लेडी कुलसुम बेगम) या हेरिटेज इमारतीलगत शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 व्या वित्त आयोगांतर्गत ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट नवीन मुख्य इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून, ही इमारत हेरीटेज असल्यामुळे हे बांधकाम कोणाच्या परवानगीने सुरू आहे, असा सवाल मुरुडकरांना पडला आहे.

शासनाच्या नियमानुसार कोणत्याही हेरिटेज वास्तुच्या लगत बांधकाम करणे कायद्याने चुकीचे आहे. अजून एक कहर असा की संबंधित ठेकेदाराने येथील काम सुरू करताना त्या रुग्णालयाची पाण्याची, लाईटची व फायर फायटरची सर्व जोडणी (कनेक्शन) तोडून टाकल्यामुळे येथे येणार्‍या बाह्यरुग्ण सेवेच्या रुग्णांना पाण्याची गैरसोय झाली आहे. यास जबाबदार कोण? माहिती घेतली असता हे काम राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत जरी असले, तरी ही इमारत जिल्हा चिकित्सक रायगड यांच्या निगराणीखाली आहे, त्यामुळे जर का हे बांधकाम बंद केले नाही तर आम्ही मुरुडकर तीव्र आंदोलन करु, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Exit mobile version