अवाजवी बील आकारणीचा ग्राहकाला फटका

वीज कर्मचाऱ्याची चौकशी करण्याची मागणी

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

दुरुस्त असलेले मीटर नादुरुस्त दाखवून जाणूनबुजून अवाजवी बील आकारणी करणाऱ्या मुरुडच्या वीज कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यातील विशेष बाब म्हणजे रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी अपेक्षित सुविधा नाकारल्याने वीज खंडित करण्याची धमकी या वीज कर्मचाऱ्याने दिल्याचे समोर आले आहे.

मुरुड शहरा नजिकच्या विहुर ग्रामपंचायत हद्दीत मसी ब्रिझफ रिसॉर्ट आहे. याचे मालक शफी हसन तांडेल यांनी याबाबतची तक्रार राज्याचे उपमुख्यमंत्री, गृह, ऊर्जा, विधी व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. सदर रिसॉर्टमध्ये वेगवेगळे असे एकूण चार मीटर असून, त्यातील एका मीटरची गेल्या काही महिन्यांपासून बिल आकारणीमध्ये नादुरुस्त मीटर दाखवून अंदाजे व अवास्तव भरमसाठ आकारणी केली जात आहे. झीरो युनिट आकारणी केलेले बिल सरासरी बिलापेक्षा जास्त असल्याने यासंबंधी 19 जून रोजी उप अभियंता मुरुड यांच्याकडे लेखी तक्रार तांडेल यांनी दाखल केली होती. मीटरची तपासणी करण्यासाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी केलेल्या अनपेक्षित मागणीस रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी नकार दिला.

सदर कर्मचारी रिसॉर्टमध्ये अधूनमधून येऊन वीजपुरवठा खंडित करीत असल्याने त्याचा नाहक त्रास ग्राहक पर्यटकांना होत असून रिसॉर्टचेही आर्थिक नुकसान होत आहे. रिसॉर्टमध्ये एकूण चार मीटर असून ते एकाच खोलीत बसवलेले आहेत. वास्तविक, अन्य तीन मीटरचे बिल नियमित भरण्यात येत असल्याची बाब उपअभियंता मुरुड यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे तांडेल यांनी निवेदनात नमूद केले आहे. पेण येथील कार्यशाळेच्या 5 सप्टेंबरच्या अहवालात ते मीटर सुस्थितीत असून, त्यात कोणत्याही प्रकारचा दोष नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही सदर मीटरचे रिडिंग उपलब्ध नसल्याचा शेरा देण्यात का येतो, असा सवालही तक्रारीतून विचारण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध न करुन दिल्याने हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप तांडेल यांनी केला आहे. याबाबत वीज अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

Exit mobile version